कुठल्याही जीवाची हत्या पाप मानले जाते. परंतु अनेकदा स्थितीपोटी त्यांना मारावेच लागते. उदाहरणार्थ मच्छर. उन्हाळ्यात मच्छर सर्वांसाठी समस्येचे कारण ठरतात. या मच्छरांमुळे डेंग्यू-मलेरिया आजार फैलावतो आणि लोकांचा जीव धोक्यात येतो. लोक स्थानिक प्रशासन अन् सरकारला याकरता दोषी ठरवत असतात. परंतु जगात एक असा देश आहे, जेथे मच्छर मारणे पाप मानले जाते. जर प्रशासनाचे सदस्य औषध फवारण्यासाठी आल्यास लोक त्यांच्या मागे लागून त्यांना हाकलून देतात. काही महिन्यांपूर्वी या देशात मलेरियाचा फैलाव झाला तरीही लोकांनी डास मारू दिले नाहीत.

बौद्धबहुल देश असल्याने भूतानमध्ये कुठल्याही जीवाला मारणे पाप मानले जाते. भले मग तो आजार फैलावणारा किटाणूच का असेना. अशा स्थितीत मलेरियाचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासनाला वेगवेगळे उपाय अंमलात आणावे लागत आहेत. सरकारी कर्मचारी औषध फवारण्यासाठी पोहोचल्यास लोक गोंधळ घालतात. काही वर्षांपूर्वी तर बळजबरीने लोकांच्या घरात घुसून औषधाची फवारणी करण्यात येत होती. मच्छरांमध्ये देखील जीव असतो, त्याला मारले जाऊ शकत नसल्याचे लोकांचे सांगणे आहे. परंतु आता स्थिती हळूहळू बदलू लागली आहे. औषध फवारणी आपल्याच भल्यासाठी असल्याचे लोक समजू लागले आहेत.
तर आइसलँड या देशात एकही मच्छर आढळून येत नाही. हा देश उत्तर अटलांटिक महासागराच्या क्षेत्रात आहे. मच्छरच नव्हे तर येथे साप आणि इतर सरपटणारे प्राणीही दिसून येणार नाहीत. या देशात कोळ्यांच्या काही प्रजाती आढळून येतात, परंतु त्या फारशा घातक नाहीत. याचबरोबर अंटार्क्टिकामध्ये डास आढळत नाहीत. तेथे अत्याधिक थंडी असल्याने डासांचे प्रजनन शक्य नाही.









