समस्या सोडविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने आमदार असिफ सेठ व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी किल्ला तलाव, अमननगर, महावीरनगर आणि पंजीबाबा परिसराची पाहणी केली. या ठिकाणी साचणारे पाणी तसेच इतर समस्या तातडीने सोडविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आमदार सेठ यांनी सूचना केली. किल्ला तलावाच्या पाहणीवेळी नजीकच राहणाऱ्या रहिवाशांना नाल्यांमुळे त्रास होऊ नये, यासाठी योग्य प्रकारे स्वच्छता करण्याची सूचना केली. तसेच पाणी साचणार नाही. पूर येऊ नये, याबाबत खबरदारी घेण्याची सूचना केली. पंजीबाबा, अमननगर आणि महावीरनगर येथे रहिवाशांना ड्रेनेज व पावसाचे पाणी साचत असल्याने समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्या समस्याही सोडविण्याची सूचना करण्यात आली.
तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन
यावेळी युवानेते अमन सेठ, मनपा आयुक्त शुभा बी., साहाय्यक कार्यकारी अभियंता अंकित राजेंद्र, अनुप कनोज, अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर उपस्थित होत्या. आमदार सेठ यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून तातडीने समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले.









