केआयआयटी विद्यापीठ दोषी : मानवाधिकार आयोगाचा निर्णय
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशातील केआयआयटी विद्यापीठात मागील महिन्यात एक 20 वर्षीय नेपाळी विद्यार्थिनी मृत आढळून आली होती. विद्यार्थिनीचा मृतदेह वसतिगृहातील तिच्या खोलीत सापडला होता, यानंतर विद्यापीठाच्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित झाले होते. या पूर्ण घटनाक्रमावर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वत:चा निर्णय दिला आहे. आयोगाने विद्यापीठाला विद्यार्थिनीच्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरविले आहे. आयोगानुसार विद्यापीठ संस्थेने विद्यार्थिनीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले हेते.
बी.टेकच्या विद्यार्थिनीने 16 फेब्रुवारी रोजी दुपारी वसतिगृहातील स्वत:च्या खोलीत आत्महत्या केली होती. विद्यार्थिनीने स्वत:च्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरावर ब्लॅकमेलिंग करण्याचा आरोप केला होता. आरोपी बी.टेकच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून त्याचे नाव अदविक श्रीवास्तव आहे. अदविकला पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी सुरू झालेल्या निदर्शनानंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी 1 हजारांहून अधिक नेपाळी विद्यार्थ्यांवर वंशद्वेषी टिप्पणी केली होती.
याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर मानवाधिकार आयोगाने चौकशी सुरू केली होती. आरोपीने पीडित विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले होते आणि तरीही विद्यापीठाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. विद्यार्थिनीचा सन्मानाने जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आणि हा प्रकार राज्यघटनेच्या अनुच्छेद 14, 15 आणि 21 अंतर्गत अधिकारांचे स्पष्ट उल्लंघन करणारा असल्याचे आयोगाने स्वत:च्या अहवालात म्हटले आहे.
विद्यापीठाची असंवेदनशीलता
केआयआयटी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना घाईगडबडीत वसतगृहातून बाहेर काढण्यात आल्याचे मान्य केले आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेची चिंता केली नाही. दुर्दैवाने विद्यापीठाला याबद्दल कुठलाच पश्चाताप नव्हता. यातून असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.









