ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ईदसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. जावेद अहमद वानी (25) असे अपहरण झालेल्या जवानाचे नाव आहे.
जावेदची पोस्टींग लेहमध्ये होती. तो ईदनिमित्त सुट्टीवर आपल्या गावी आला होता. शनिवारी तो आपल्या कारने चहलगाम येथे जात होता. अनेक तास बेपत्ता राहिल्यानंतर शनिवारी रात्री गावातील लोकांनी त्याचा शोध सुरू केला. जावेदचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत दिली. तपासादरम्यान, कुलगामजवळील प्रणाल येथे पोलिसांना जावेदची कार आढळून आली. या कारमध्ये जावेदची चप्पल आणि रक्ताचे डाग होते. लष्कराच्या पथकाकडून शोधमोहिम सुरू आहे. परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.









