दापोली : दापोली तालुक्यातील टाळसुरे बौद्धवाडी येथील एका १४ वर्षीय मुलाला फुस लावून नेल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. शाळेत जातो म्हणून बाहेर पडलेला हा मुलगा रिक्षातून चालक बाजूला बसून खेडला गेल्याचे अनेकांनी पाहिले. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो खेड रेल्वेस्थानकात आढळून आल्याने मुंबईत गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी हा मुलगा शाळेत जातो सांगून बाहेर पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत घरी न आल्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली. शाळेत चौकशी केली असता तो गैरहजर असल्याचे समजले. पालकांनी त्याचे मित्र तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो कोठेही आढळला नाही. म्हणून दापोली पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली.
परिसरात चौकशी केली असता हा मुलगा सकाळी एका रिक्षामध्ये चालकाच्या बाजूला बसून खेडकडे जाताना काही लोकांनी पाहिल्याचे सांगितले. त्यानुसार खेड येथील रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता रेल्वेस्थानकावर तो फिरताना आढळून आला. रेल्वेने तो मुंबईकडे गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









