घटनेने खळबळ : सुदैवाने मुलगी सुखरुप
प्रतिनिधी/ बेळगाव
बारा वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न हिंदवाडी येथील जुने महावीर गार्डनजवळ मंगळवारी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेमुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी अपहरणकर्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू केला होता. केवळ सुदैव आणि मुलीच्या धाडसपणामुळेच या अपहरण प्रकरणातून ती मुलगी बचावली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून एक व्यक्ती तिच्या मागावर होती. मंगळवारी सायंकाळी ती रोजच्याप्रमाणे क्लासला गेली होती. त्यावेळी गुरुदेव रानडे मंदिरपासून तिला जबरदस्तीने आपल्या खांद्यावर घेतले. जणू आपली मुलगीच आहे, असे भासवून त्याने तिचे अपहरण करण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गालाला, गळ्याला ओरबाडले. यावेळी ये-जा करणाऱ्यांनी ते पाहिले. मात्र आपल्या वडिलांबरोबर मस्करकी करत असेल, असे साऱ्यांना वाटले. मात्र तिने अधिक आरडाओरड केली. यावेळी गार्डनमधील माळ्याला संशय आला. त्याचा पाठलाग केला. त्यामुळे त्या भामट्याने तिला तेथेच सोडून सुभाष मार्केटकडून पलायन केले.
या घटनेनंतर त्या ठिकाणी नागरिक जमा झाले. त्यांनी त्या मुलीला विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची माहिती तातडीने टिळकवाडी पोलिसांना देण्यात आली. टिळकवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून सदर इसम 40 ते 45 वयोगटातील असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे हिंदवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चॉकलेट देण्याचा प्रयत्न
अपहरण करणारा भामटा त्या मुलीच्या क्लासच्या परिसरातच घुटमळत होता. ती क्लासमधून बाहेर पडल्यानंतर तिला त्याने चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने चॉकलेट घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने तिला खांद्यावर उचलून घेतले. मात्र त्याचा हा अपहरणाचा डाव त्या मुलीने हाणून पाडला.









