पुणे / वार्ताहर :
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचे शनिवारी रात्री 5 ते 6 जणांनी पुण्यातून अपहरण केले होते. तपासादरम्यान पोलिसांनी या तरुणाची परभणी येथून सुटका केली आहे.
बसवंत माधव गायकवाड (25, मूळ रा. नांदेड) असे सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास जनक अभ्यासिकेतून घरी जात असताना दत्तवाडी परिसरातील म्हात्रे पुलाजवळ या तरुणाचे पाच ते सहा जणांनी इर्टिगा गाडीतून अपहरण केले होते. याप्रकरणी बसवंत याचा मावस भाऊ शिवलिंग दिंगबर गायकवाड (30, रा. चिंबळी, ता. खेड, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात 5 ते 6 अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध सुरु केला. तपासादरम्यान अपहरणकर्त्यांची कार नांदेडमधील असल्याचे स्पष्ट झाले. त्यादृष्टीने पोलिसांनी दोन ते तीन पथके मार्गस्थ केली. दरम्यान, परभणीतून या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात आली.
अपहरणाचे कारण अस्पष्ट
संबंधित तरुण हा मूळचा नांदेड येथील रहिवासी असून, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी आला होता. घटनेच्या दोन दिवस आधीच तो पुण्यात दाखल झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री त्याचे अपहरण करण्यात आल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. तपासादरम्यान अपहरण करणारी कार ही नांदेड येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांची दोन ते तीन पथके कार्यरत होऊन त्यांनी तरुणाची परभणी येथून सुटका केली. मात्र, अपहरणाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सहायक पोलीस निरीक्षक एम. कुंभार अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : पुणे विमानतळावर महिला इन्स्पेक्टरला मारहाण; तरुणी गजाआड









