महिलाही सापडली, पोलिसांसमोर आव्हान; कुपवाडा पोलिसांना दापोली पोलिसांचेही सहकार्य
टाळसुरे वार्ताहर
जम्मू-काश्मीर कुपवाडा येथून महिलेचे अपहरण करून फरार झालेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या जम्मू-कश्मीर पोलिसांनी दापोलीत आवळल्याची घटना शुक्रवारी घडली.
जम्मू-काश्मीर कुपवाडा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा येथून जरिना मुश्ताक अहमद ही महिला जून महिन्यात बेपत्ता झाली होती. तिचा पती मुश्ताक अहमद याने कुपवाडा पोलीस स्थानकात तशी तक्रार दाखल केली होती. त्याचवेळेला अब्दुल कादिर खान यानेच तिचे अपहरण केले असण्याची शक्यता मुश्ताक अहमद याने वर्तवली होती. अब्दुल खान याचा राजस्थान व महाराष्ट्रात संपर्क असण्याची शक्यता असल्याने जम्मू-काश्मीर पोलिसांनी महाराष्ट्रातील काही भागात सापळा रचला होता. त्यानुसार दापोली हद्दीमध्ये अब्दुल खान असल्याची खबर पोलिसांना उपलब्ध झाली होती. यापूर्वीही जम्मू काश्मीर पोलीस दापोलीमध्ये येऊन गेले होते. मात्र त्यांच्या हाती कोणताही पुरावा लागला नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज अहमद यांनी सांगितले.
19 जून रोजी दापोलीत अब्दुल कादिर खान व अपहरण झालेली महिला जरिना असल्याचा सुगावा त्यांना लागला. त्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज अहमद, हेडकॉन्स्टेबल महंमद याकूब, चालक कयूम असे पोलीस पथक दापोलीत शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास दाखल झाले. दापोली परिसरातील काही हॉटेल्सची तपासणी केली असता अब्दुल खान व त्याच्यासमवेत जरिना अहमद आढळली. कुपवाड पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. जरिना हिची ओळख पटवण्यासाठी तिचा पती मुश्ताक अहमद यालाही जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोबत आणले होते. त्यामुळे ओळख पटवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. कुपवाड पोलिसात भादंवि कलम 366 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास कुपवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज अहमद करत आहेत.
या घटनेवरून अन्य राज्यांमधून दापोलीसारख्या ठिकाणी लपून राहण्यासाठी आरोपी येत असल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे. दापोली पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटनासाठी बाहेरून येणाऱया पर्यटकांचे प्रमाण अधिक आहे. या पर्यटकांच्या आडून येणाऱया गुन्हेगारांना ओळखणे कठीण जात आहे. त्यामुळे प्रत्येक पर्यटकाची ओळख तपासणे अतिशय महत्वाचे झाले आहे. अब्दुल कादिर हा गुन्हेगार दापोलीत आल्यानंतर त्याला कोणी सहकार्य केले आहे का? तो दापोलीतच कसा आला? यापूर्वी तो येथे आला होता का? आदी माहिती तपासण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे, असे रियाज अहमद यांनीही स्पष्ट केले. या प्रकरणांमध्ये दापोली पोलिसांनीही महत्वाची भूमिका बजावली असून त्यांचे चांगले सहकार्य लाभल्याचे अहमद यांनी सांगितले.









