चौघा अपहरणकर्त्यांना अटक, आणखी काही साथीदार फरार ; निपाणीजवळ ठेवले होते कोंडून
प्रतिनिधी / बेळगाव
राजापूर (ता. मुडलगी) येथील रियल इस्टेट व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे. निपाणीजवळ ही कारवाई करण्यात आली असून अपहृताची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरारी असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.
रमेश मारुती कांबळे (वय 38) रा. चिनगुंडी, ता. जमखंडी, राघवेंद्र यमनाप्पा बन्नवगोळ (वय 28) रा. मुडलगी, ईश्वर परशुराम रामगनट्टी (वय 20) रा. कोण्णूर, ता. गोकाक, सचिन रामप्पा कांबळे (वय 32) रा. चिनगुंडी, ता. जमखंडी अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. एफआयआर दाखल झाल्यानंतर 24 तासात अपहरण प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे.
दि. 14 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दंडापूरजवळून बसवराज निलप्पा अंबी (वय 48) रा. राजापूर, ता. मुडलगी या रियल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले होते. बसवराजची पत्नी शोभा अंबी यांनी घटप्रभा पोलीस स्थानकात मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गोकाक व चिकोडी पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली तीन पथके कार्यरत होती. निपाणीजवळ अपहृत बसवराजला कोंडून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी बसवराजची सुटका करून अपहरण करणाऱ्या चौघा जणांना अटक केली आहे. बसवराजचे अपहरण केल्यास त्याच्याजवळ पैसा आहे. सहजपणे मोठी रक्कम कमावता येईल, असा सल्ला बसवराजच्या एका परिचिताने अपहरणकर्त्यांना दिला होता, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.









