कोल्हापूर : श्री क्षेत्र आदमापूर येथून अपहरण झालेल्या 6 वर्षाच्या मुलाचा शोध कोल्हापूर पोलीसांनी मोठ्या शिताफिने लावला. 48 तासात मुलाचा शोध घेऊन दोघा आरोपींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. अपहरण झालेला मुलगा सुखरूप असून, त्याला आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यामधील शिवाजीनगर येथे राहणारे सुषमा राहुल नाईकनवरे हे श्री क्षेत्र आदमापूर येथे देवदर्शनासाठी आले होते. त्यादिवशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ते आंघोळीसाठी गेले असताना त्यांच्यासोबत असलेल्या सहा वर्षाच्या लहान मुलाचे अज्ञातांनी अपहरण केले. त्याबाबतची फिर्याद त्यांनी भुदरगड पोलिसात दिली.. कोल्हापूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सात तपास पथक तैनात करून तपासासाठी विविध दिशेला पाठवण्यात आली होती. पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. तपासात गुन्हेगार हा भुदरगड हद्दीतून कर्नाटक हद्दीत निपाणी, चिकोडी,अंकली, चिंचणी, मायाका, मार्गे मिरज कडे गेल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही फुटेज वरून गाडीचा नंबर घेत तांत्रिक दृष्ट्या पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावरून माहितीच्या आधारे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. गुन्हेगार मोहन अंबादास शितोळे मूळ रा. मेढा, जावळी,सातारा त्याची छाया शितोळे हे असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणातील आरोपी हे फिरस्ते असून त्यांचा ठावठिकाणा शोधून काढणे व लहान मुलांची सुखरूप सुटका करणे हे पोलीस पथकासमोर आव्हान होते. मात्र, तांत्रिक माहितीच्या आधारे हे आरोपी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा येथे राहत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. तपास पथकातील अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन दोघा आरोपींना आणि अपहरण झालेल्या मुलास ताब्यात घेतले. दोघा आरोपींना भुदरगड पोलिसांच्या स्वाधीन केले असून, मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.