मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : अंतिम फेरीत चीनच्या फेंगकडून पराभव
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
भारताच्या किदाम्बी श्रीकांतला दीर्घकाळापासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवता आला नसला तरी त्याने येथे झालेल्या मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार प्रदर्शन उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. अंतिम फेरीत त्याला चीनच्या जागतिक चौथ्या मानांकित लि शि फेंगकडून पराभव पत्करावा लागला.
32 वर्षीय श्रीकांतने दुखापत आणि हुकलेल्या संधींचा अडथळा पार करीत बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरवरील स्पर्धेत सहा वर्षांत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. पात्रता फेरीपासून सुरुवात करीत त्याने जेतेपदासमीप झेप घेतली होती. येथे दुसरे मानांकन मिळालेल्या लि फेंगचा भक्कम बचाव त्याला मोडता आला नाही आणि त्याला 36 मिनिटांच्या खेळात 11-21, 9-21 असा पराभव स्वीकारावा लागला. ‘या आठवड्यात माझ्याकडून झालेल्या कामगिरीवर मी समाधानी आहे. ही माझी तिसरी स्पर्धा असून पहिल्या दोन स्पर्धांत मी बऱ्यापैकी चांगले प्रदर्शन केले. पण मला ते सामने जिंकता आले नाहीत. पण आतापर्यंतच्या कामगिरीचे मला समाधान वाटते. पुन्हा एकदा पोडियमवर येता आले याचा खूप आनंद वाटतो,’ अशा भावना श्रीकांतने व्यक्त केल्या. माजी अग्रमानांकित असलेला श्रीकांत सध्या जागतिक क्रमवारीत 82 व्या स्थानावर आहे.









