मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : अन्य खेळाडू पात्रता फेरीतच अपयशी
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
भारताच्या किदाम्बी श्रीकांतने येथे सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले. मात्र अन्य भारतीयांना पात्रता फेरी पार करण्यात अपयश आले. या सुपर 500 स्पर्धेतील त्यांचे आव्हान पात्रता फेरीतच समाप्त झाले.
श्रीकांतने चिनी तैपेईच्या हुआंग यु काइविरुद्ध खेळताना पहिला गेम गमविला. पण त्यातून सावरत त्याने नंतरचे दोन गेम जिंकत मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले. श्रीकांतने ही लढत 9-21, 21-12, 21-6 अशी जिंकली. त्याआधी पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात त्याने तैपेईचा आणखी एक खेळाडू कुओ कुआन लिनचा 21-8, 21-13 असा पराभव केला होता. या माजी जागतिक अग्रमानांकित खेळाडूची मुख्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत चीनच्या सहाव्या मानांकित लु गुआंग झु याच्याशी लढत होईल.
अन्य सामन्यात तरुण मन्नेपल्लीला थायलंडच्या पनितचाफोन तीरारात्सकुलने 21-13, 23-21, एस. शंकर मुथुसामी सुब्रमण्यमला चीनच्या झु जुआन चेनने 22-20, 22-20 असे पात्रता फेरीतच हरविले. महिला एकेरीत अनमोल खर्बला तैपेईच्या हंग यि टिंगने 21-14, 21-18 असे हरविले. मिश्र दुहेरीत मोहित जगलन व लक्षिता जगलन यांनाही पराभव पत्करावा लागला. यांना मलेशियाच्या मिंग याप टू व ली यु शान यांनी 21-15, 21-16 असे हरविले. भारताचे टॉपचे खेळाडू पीव्ही सिंधू व एचएस प्रणॉय यांचे सामने बुधवारी होणार आहेत.









