जकार्ता : येथे सुरु असलेल्या इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय यांनी शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय, पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी-सात्विकसाईराज यांनी देखील उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीत मात्र पीव्ही सिंधूला दुसऱ्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीत गुरुवारी दुसऱ्या फेरीचा सामना दोन भारतीय खेळाडूंत झाला. किदाम्बी श्रीकांत व युवा लक्ष्य सेन यांच्यातील सामन्यात श्रीकांतने बाजी मारली. 45 मिनिटे चाललेल्या या सामन्यात लक्ष्यने श्रीकांतला चांगलीच टक्कर दिली पण श्रीकांतने अनुभव पणाला लावत हा सामना 21-17,22-20 असा जिंकला. आता, श्रीकांतची पुढील लढत चीनच्या ली शी फेंगशी होईल. पुरुष एकेरीतील अन्य एका सामन्यात एचएस प्रणॉयने हाँगकाँगच्या लाँग अॅगसला 21-18, 21-16 असा पराभवाचा धक्का दिला. त्याचा पुढील सामना जपानच्या नाराओकाशी होईल. अन्य एका लढतीत इंडोनेशियाच्या अँटनी गिंटींगने भारताचा युवा खेळाडू प्रियांशू राजावतला 20-22, 21-15, 21-15 असे पराभूत केले.
सिंधूचे आव्हान संपुष्टात
महिला एकेरीतील सामन्यात सिंधूची अपयशी मालिका या स्पर्धेतही कायम राहिली. तैपेईची अव्वल खेळाडू ताय त्झू यिंगने तिला 21-18, 21-16 असा पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे, या सामन्यात सिंधूकडून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या यिंगला कडवी टक्कर मिळेल अशी अपेक्षा होती. पण, यिंगने वर्चस्व गाजवताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.









