मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : तनाकाला हरवून सहा वर्षांत प्रथमच अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/कौलालंपूर
भारताच्या अनुभवी किदाम्बी श्रीकांतने मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असून सहा वर्षांत प्रथमच त्याने एखाद्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य लढतीत त्याने जपानच्या युशी तनाकाचा सरळ गेम्सनी पराभव करून जेतेपदासमीप झेप घेतली आहे. 32 वर्षीय श्रीकांतने नेटजवळ अचूक व आक्रमक खेळ करीत जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानावर असणाऱ्या तनाकाचे आव्हान 21-18, 24-22 असे संपुष्टात आणले. जेतेपदासाठी त्याची लढत चीनच्या दुसऱ्या मानांकित लि शि फेंगशी होईल. 2019 मध्ये इंडिया ओपन स्पर्धेत त्याने अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर प्रथमच तो बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धेत त्याने अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. माजी अग्रमानांकित असलेला श्रीकांत सध्या जागतिक क्रमवारीत 65 व्या स्थानावर आहे. गेल्या काही मोसमांत त्याचे प्रदर्शन निराशाजनकच झाले होते. खराब फॉर्म व तंदुरुस्तीची समस्या हे त्याचे कारण होते.
नैसर्गिक प्रतिभा लाभलेल्या खेळाडूने 2017 मध्ये बीडब्ल्यूएफच्या चार स्पर्धा जिंकत असा पराक्रम करणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने भारताला सांघिक सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. 2019 मध्ये तो चांगल्या टचमध्ये दिसत होता. पण दुखापती आणि कोव्हिडमुळे पात्रता स्पर्धा रद्द केल्यामुळे तो टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नव्हता. 2022 मध्ये भारताने थॉमस चषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती, त्या यशातही श्रीकांतचा मोलाचा वाटा होता. यावर्षीच्या थायलंड ओपन सुपर 300 स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती तर 2023 मध्ये स्विस ओपन व मकाव ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत झेप घेतली होती.









