प्रतिनिधी,सुधाकर काशीद
ज्या कड्यावर पुरुष गिर्यारोहकही सहजासहजी चढाई चढायचे धाडस करत नाही. महिलांनी तर या कड्यावर चढायचा यापूर्वी कधी फारसा प्रयत्नही केला नाही. असा महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि अजस्त्र सरळसोट हरिश्चंद्र कडा पार करायचे धाडस कोल्हापूरची खुशी कुंभोज व अरमान मुजावर या दोघींनी केले आहे. आणि या चित्तवेधक पाच दिवसाच्या हरिश्चंद्रगड चढायची स्टेपिंग स्टोन ही चित्त थरारक चित्रकथा महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांसमोर प्रथमच येणार आहे .जागतिक महिला दिन वेगवेगळ्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या ठिकाणी जरूर साजरा होत आहे. पण महिलांच्यात दडलेल्या असाधारण जिद्दीची ही चित्रबद्ध कथा आज प्रदर्शित करत महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे.
हरिश्चंद्रगड 1800 फूट उंचीचा आहे. ठाणे ,पुणे व नाशिक जिह्याच्या हद्दीवर हा गड आहे. या गडाच्या पश्चिम बाजूचा कडा सरळसोट आहे. कोठेही थांबायला जागा नाही. केवळ दोर लावून चढणे हाच एक मार्ग आहे. दोरावरून कडा चढायला चार दिवस लागतात. या काळात दिवस मावळला की दोरावर स्वत:ला सुरक्षित टांगून घेत तेथेच रात्र काढावी लागते. अशा वातावरणात चार रात्री दोरावर टांगून घेत या दोघींनी या हरिश्चंद्रगडाची चढाई पूर्ण केली आहे. पण अशक्य अशी वाटणारी ही पूर्ण मोहीम कॅमेऱ्यात टिपली गेली आहे. आणि हीच मोहीम उद्या महिला दिनाचे औचित्य म्हणून सर्वांना प्रथमच पाहायला मिळणार आहे.
हरिश्चंद्र गडाचा कडा म्हणजे महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ही ओळखला जातो. हा अजस्त्र कडा पार करणे हे गिर्यारोहकांचे स्वप्न असते. पण1800 फूट फक्त दोराच्या साह्याने चार दिवस चढत राहणे हे फक्त मर्यादित गिर्यारोहकांनाच आजवर जमले आहे. संधी, शारीरिक मर्यादा यामुळे महिला गिर्यारोहक हरीश्चंद्र गडापासून तशा लांबच राहिल्या आहेत. पण खुशी काम्बोज व अरमान मुजावर यांनी या गडावर कड्यावरून चढायचे आव्हान स्वीकारले. त्यांच्या आव्हानाचे कौतुक होण्याऐवजी बहुतेकानी पहिल्यांदा त्याला वेड्यात काढले. डोक्यावर पडलायसा काय? अशा कोल्हापुरी भाषेत प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या. पण या दोघी वरवर शांत आणि आतून मात्र जिद्दीने खदखदणाऱ्या. त्यामुळे त्यांनी हे आव्हान शांतपणे स्वीकारले. अर्थात त्यांचे कुटुंबीय, अन्य सहकारी मित्र यांचे पाठबळही मिळाले. व त्यांनी सर्व सुरक्षिततेची खबरदारी घेत हरिश्चंद्र गडाच्या कड्यावरील चढाईस सुरुवात केली. पाच दिवसाच्या या चढाईत चार रात्री त्यांनी स्वत:ला दोरावर सुरक्षित टांगते राहूनच अनुभवल्या. व पाचव्या दिवशी त्या गडावर जाऊन पोहोचल्या. त्यांना चढताना काही वाटले नाही. पण शेवटी कड्यावरून खाली डोकावून पाहताना आपण एवढे अंतर केवळ दोराच्या साह्याने चढून आलो म्हणून त्या स्वत: च क्षणभर आवाक झाल्या.
त्यांचा हा चित्त थरारक पूर्ण प्रवास कॅमेऱ्यात टिपला गेला आहे. तो आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रथम सर्वांच्या समोर खुला होत आहे. रिझर्व बँकेच्या निवृत्त डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, जिल्हाधिकारी राहुल रेखावार ,शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीत हा अनोखा महिला दिन साजरा होत आहे. हिल रायडर्स फाउंडेशन, शहीद राजू जाधव फाउंडेशन, कोल्हापूर माउंटेनियरिंग अँडवेंचर फाउंडेशन व समीट अॅडवेंचर्स यांनी या आगळ्यावेगळ्या महिला दिनाचे आयोजन केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









