वृत्तसंस्था / अमान (जॉर्डन)
येथे सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटातील पुरुष आणि महिलांच्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या खुशी चंद आणि टिकाम सिंग यांनी आपल्या वजन गटातून उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे.
मुलींच्या 17 वर्षांखालील वयोगटातील 46 किलो वजन गटात खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या खुशी चंदने व्हिएतनामच्या नेगुएन येनचा सरस गुणाच्या जोरावर पराभव करत उपांत्यफेरी गाठली. 2024 साली अबुधाबीमध्ये झालेल्या आशियाई शालेय मुले आणि मुलींच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत खुशीने कांस्यपदक मिळविले होते. महिलांच्या 52 किलो वजन गटात जपानच्या रुना इटोने भारताच्या समिक्षा प्रदीप सिंगचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. 54 किलो वजन गटात भारताच्या जेनतने युक्रेनच्या रुमेन सेव्हाचा 4-1 असा पराभव केला.
पुरुषांच्या 52 किलो वजन गटात भारताच्या टिकम सिंगने पॅलेस्थिनच्या दियाबला सरस गुणाच्या जोरावर पराभूत करत उपांत्यफेरी गाठली आहे. 48 किलो गटात भारताच्या आंबेकर मेताई, उदम सिंग, राहुल गरीया यांनी प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले. भारताच्या ध्रुव खर्बला युक्रेनच्या सिडोरेंकोने 0-5 असे पराभूत केले. भारताच्या अमनदेवने जॉर्डनच्या अल खलीदीवर 3-2 अशी मात केली.









