प्रतिनिधी /पणजी
खोर्ली भोम भागातून जाणाऱया राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणास खोर्ली भोम नागरिकांना विरोध केला आहे. काल मंगळवारी भोम येथील संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुमारे आठ जणांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे भूसंपादन अधिकारी चंद्रकांत शेटकर यांची भेट घेऊन विरोध व्यक्त केला.
राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण प्रकरणात सार्वजनिक बांधकाम खात्याने भोम खोर्ली परिसरातील लोकांना कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच व्यवस्थित नियोजन नसल्याचे संजय नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सार्वजनिक खात्याच्या संबंधित अधिकाऱयांनी भोम खोर्ली परिसरात येऊन पहाणी करावी रस्ता रुंदीकरणाचा स्थानिकांना काय त्रास होणार त्याबाबत विचार करावा असेही त्यांनी सांगितले. आमच्या प्रश्नावर तोडगा काढण्याअगोदर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु केल्यास दोन्ही गावातील लोक कामाला विरोध करणार असल्याचा इशाराही संजय नाईक यांनी दिली आहे.









