खेड पोलिसांची कामगिरी, संशयित 4 दिवस पोलीस कोठडीत
खेड/ प्रतिनिधी
तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांना स्कीमच्या माध्यमातून महिलांना महागडी हातशिलाई मशिन तर काही महिलांना मोडकळीस आलेले घर स्कीममधून दुरुस्त करून देण्याचे आमिष दाखवत महिलांना 23 लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील एकजण फरार असून पोलीस शोध घेत आहेत.
महाराष्ट्र क्रांती सेनेचा अध्यक्ष संदिप शंकर डोंगरे( वाराणी, कासार, जि. बीड) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.व बबन मारुती मोहिते हा फरार आहे. या दोन भामट्यांनी तालुक्यातील महिलांना महिला बचत गटाच्या आर्थिकदृष्टया दुर्बल व वंचित महिलांना घर किंवा उद्योगासाठी शिलाई मशिनच्या नावाखाली प्रत्येकी १६०० रुपये याप्रमाणे त्यांच्याकडून रक्कम गोळा केली. यातील १ लाख २५ हजार ६०० रुपयांचे शिलाई मशिनसाठी दिले. यातील काही रक्कम ही स्कीमसाठी काम करणाऱ्या महिलांचे मानधन व प्रवास भत्त्यासाठी देण्यात आली होती.
या फसवणुकीबाबत महिला बचत गटातील 819 महिलांनी येथील पोलीस स्थानकात तब्बल 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली होती. यानंतर बचत गटातील 9 महिलांनीही दोन लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती. याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती देत एकास अखेर अटक केली. या प्रकरणातील फसवणीचा आकडा फसवणुकीचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्या महिलांनी पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी केले आहे.