खेड :
दोन तरुणींशी विवाह केल्यानंतरही तिसऱ्या तरुणीबरोबर बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या खेड तालुक्यातील योगेश यशवंत हुमणे (३३) नामक भामट्यास माथेरान नेरळ येथे पोलिसांनी गजाआड केले. या भामट्याने अनेक महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. तरुणाच्या आमिषाला बळी पडलेली एक महिला पोलीस कॉन्स्टेबल असल्याची बाबदेखील समोर आली आहे.
एका तरुणीने भामट्याविरोधात रितसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सगळा प्रकार उघडकीस आला आहे. हा भामटा सोशल मिडियाचा वापर करत महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत बोलणे करून ओळख वाढवत होता. महिलाचे लग्न झालेले आहे की नाही, हे देखील तो सोशल मिडियाच्या माध्यमातून हेरून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करत होता. स्वतःचे
लग्न झालेले असतानाही अविवाहित असल्याचेदेखील भासवत होता, असे तपासात उघड झाले आहे.
दोन तरुणींशी लग्नगाठ बांधल्यानंतर तिसरीसोबत लग्नाची बोलणी करत सुपारीही फोडण्याचा कार्यक्रमही धुमधडाक्यात केला. तिसरीसोबत बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असतानाच फसवणूक झालेल्या एका तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याचे बिंग फुटले. या भामट्याने अनेक महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यादृष्टीने पोलीस त्याचे कारनामे उघड करण्यासाठी सखोल तपास करत आहेत.








