खेड / सचिन खेडेकर :
येथील एसटी आगाराच्या नादुरुस्त बसफेऱ्यांची समस्या प्रवाशांसाठी आधीच डोकेदुखी ठरत असताना बसस्थानकालाही नानाविध समस्यांचा लागलेला विळखा सुटता सुटेनासा झाला आहे. दोन्ही प्रवेशद्वारावर सांडपाण्याच्या उपीळी लागल्या असून खड्यांसह चिखल व दुर्गंधीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. हीच परिस्थिती गणेशोत्सवातही राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बसस्थानकाच्या आवारात मच्छीविक्रेत्या महिलांचा होणारा गोंधळ, मृतमासळीचा सुटणारा दुर्गंध, विनापरवाना दुचाकींची पार्किंग, सुलभ शौचालय आणि लघुशंकागृहाची अस्वच्छता व दुर्गंधीचा त्रास प्रवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून सोसावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नादुरुस्त एसटी बसेसमुळे फेऱ्या उशिरा सुटत असल्याने स्थानकात तासन्तास तिष्ठत बसणे, मार्गस्थ झालेल्या काही फेऱ्या भर रस्त्यातच बंद पडून प्रवाशांचा खोळंबाही होत आहे.
प्रवासी आमचे दैवत, बहुजन हिताय बहुजन सुखाय, प्रवाशांच्या सेवेसाठी, वाटेल तेथे प्रवास करा यासारखी ब्रीदवाक्य घेवून एसटी सेवेकडे आकर्षित करू पाहणारे येथील बसस्थानक प्रवाशांच्या उपायाऐवजी अपायच ठरू पाहतेय. बसस्थानकाच्या छतावर नवीन पत्रे टाकून गळती थांबवण्याबरोबरच भिंतीवर रंगरंगोटी करण्यात आली आहे.
मात्र, आवारात जागोजागी पडलेले खड्डे तुडवत वेळेप्रसंगी दुर्गंधीयुक्त चिखलमिश्रित पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. दोन्ही प्रवेशद्वारावर सांडपाणी उपीळद्वारे बाहेर पडून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वारालगत लाखो रुपये खर्चुन बांधलेल्या प्रवाशी शेडसमोर चिखल साचल्याने शिवाय समोर विनापरवाना दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने शेडमध्ये बसण्याचे प्रवाशांसह विद्यार्थी टाळत आहेत. तसेच लगतची संरक्षक भिंतही अर्धी कोसळली असल्याने पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनली आहे. गेल्या काही वर्षांपासून बंदावस्थेतील उपाहारगृह यंदाही खुले होण्याची शक्यता नसल्याने प्रवाशांसह चालक-वाहकांची गैरसोय जैसे-येच आहे.
रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव सुरू होत आहेत. महाडनाक्यातील गोळीबार मैदानात येथील एसटी आगाराच्या नूतन बसस्थानकाचे बांधकाम हाती घेण्यात आल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून या मैदानातून गणेशोत्सवात सोडण्यात येणाऱ्या जादा परतीच्या बसफेऱ्यांची प्रथा यंदाच्या गणेशोत्सवात खंडित होणार आहे.
त्यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या सोयीसाठी धावणाऱ्या नियमितसह जादा गाड्यांच्या फेऱ्या याच बसस्थानकातून सोडण्यात येणार असल्याने याठिकाणी बसेससह चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसून येणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा बसस्थानकातील याच समस्यांनी स्वागत करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- गणेशोत्सवापूर्वी खड़े बुजवण्यासह चिखल जेसीबीद्वारे साफ करणार
बसस्थानकाच्या आवारात उपीकद्वारे येणारे दुर्गंधीयुक्त सांडपाणी वरच्या बाजूस असलेल्या इमारतीचे असून या समस्येबाबत नगरपरिषदेकडे तक्रार करण्यात आली आहे. स्थानकातील खड्डे सिमेंटच्या ब्लॉकने भरण्यात आले. मात्र पुन्हा त्याठिकाणी नवीन खड्डे निर्माण झाले आहेत. खड्डे बुजवण्यासह साचलेला चिखल जेसीबीच्या सहाय्याने उपसून गणेशोत्सवापूर्वी बसस्थानक आवार सुस्थितीत करणार असल्याचे आगारप्रमुख रणजीत राजेशिर्के यांनी सांगितले.








