दुसऱ्या कसोटीत बेअरस्टोला वादग्रस्तरित्या बाद दिल्यानंतर इंग्लिश चाहत्यांचा राग अनावर
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने जिंकली. लॉर्ड्स कसोटीच्या अखेरच्या दिवशी मैदानावर मैदानाबाहेर अनेक अशा घटना पाहायला मिळाल्या ज्या पूर्णपणे अनपेक्षित होत्या. लॉर्ड्सच्या मेंबर्स एरिआमध्ये खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत गैरव्यवहार देखील झाला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना धक्काबुक्की करणाऱ्या त्यातील सदस्यांवर आता मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) कारवाई केली आहे.
पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघ ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होते. ऑस्ट्रेलियन खेळाडूंविषयी इंग्लंड संघाच्या समर्थकांमध्ये प्रचंड संताप दिसत होता. कारण त्याआधीच त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याला चुकीच्या पद्धतीने बाद दिले गेले होते. याच पार्श्वभूमीवर खेळाडू ड्रेसिंग रुमकडे परतताना लाँग रुममध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि त्याठिकाणी उपस्थित सदस्य यांच्यात वाद झाला. काही सदस्यांनी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उस्मान ख्वाजा व डेव्हिड वॉर्नर यांना काही अपशब्द वापरले. तसेच काहींनी ख्वाजाशी झटापट देखील केली.
बेअरस्टोच्या वादग्रस्त रनआउटनंतर वादाला सुरुवात
वास्तविक, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जॉनी बेअरस्टो अत्यंत विचित्र पद्धतीने धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंड संघाच्या 52 व्या षटकात ही घटना घडली. कॅमरुन ग्रीन सातत्याने शॉर्ट पिच चेंडू टाकत होता. अशा स्थितीत षटकातील शेवटचा चेंडू सोडल्यानंतर बेअरस्टो लगेचच क्रीजच्या बाहेर गेला. या दरम्यान, अॅलेक्स केरीच्या हातात चेंडू येताच त्याने तो थेट स्टप्म्सवर मारला. चेंडू विकेटवर आदळला तेव्हा बेअरस्टो क्रीजच्या बाहेर होता आणि अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्याच्या आऊटचे अपील केले. यानंतर मैदानावरील पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवला. थर्ड अंपायरने बेअरस्टोला बाद घोषित केले. यानंतर बेअरस्टोची नाराजी त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होती. बेअरस्टोला थर्ड अंपायरने आऊट दिल्यावर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी चिट-चिटच्या घोषणा देत आपला राग व्यक्त केला.
ख्वाजा-वॉर्नरशी बाचाबाची
दरम्यान, लंचच्या वेळी ऑस्ट्रेलियन टीम लॉर्ड्स स्टेडियमच्या लाँग रुममधून ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होती, त्याचवेळी तेथे उपस्थित एमसीसी सदस्याने काही तरी टिपणी केली. याला प्रत्युत्तर देताना उस्मान ख्वाजाने त्या सदस्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, ख्वाजाच्या मागे येणारा डेव्हिड वॉर्नरही एमसीसीच्या त्या सदस्याला उत्तर देताना दिसला.
या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एमसीसीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करत गैरवर्तन करणाऱ्या तीन सदस्यांवर कारवाई केली. तसेच, क्रिकेट ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची माफी देखील मागितली. एमसीसीने म्हटले, लॉंग रुममधून ड्रेसिंग रूमकडे जाणे, ही एक महान परंपरा आहे. घडलेल्या घटनेबद्दल सर्वांना खेद आहे.









