हॉररसोबत सस्पेन्सचा अनुभव देणारी वेबसीरिज ‘खौफ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 8 एपिसोड्स असलेल्या या सीरिजमध्ये मोनिका पवार, रजत कपूर, अभिषेक चौहान, गीतांजली कुलकर्णी आणि शिल्पा शुक्ला यासारखे दमदार कलाकार आहेत. या सीरिजचे पोस्टर सादर करत निर्मात्यांनी याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.
या वेबसीरिजचे दिग्दर्शन पंकज कुमार आणि सूर्या बालकृष्णन यांनी केले आहे. ही सीरिज नव्या शहरातील हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या एका युवतीची कहाणी दर्शविणारी आहे. खौफ ही मधू नावाच्या युवतीची घाबरविणारी आणि रहस्यमय कहाणी आहे. मधू एका शहरात स्वत:च्या नव्या जीवनाची सुरुवात होण्याच्या अपेक्षेने दाखल झालेली असते आणि ती एका हॉस्टेलमध्ये राहू लागते. तर या हॉस्टेलचा इतिहास आणि रहस्यांबद्दल ती अनभिज्ञ असते. हॉस्टेलच्या खोलीत आणि बाहेर अज्ञात शक्ती तिचा पाठलाग करू लागतात असे यात दाखविण्यात येणार आहे.
खौफ ही सीरिज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सस्पेन्स हॉरर ड्रामामध्ये एक अद्वितीय क्षमता असते. खौफ ही प्रेक्षकांना भीतीच्या छायेत खोलवर जाण्याचा रोमांच देते, प्रेक्षकांना ही सीरिज नक्कीच पसंत पडेल असे वक्तव्य प्राइम व्हिडिओचे पदाधिकारी निखिल मधोक यांनी केले आहे.









