मित्रांसमवेत सहलीला गेला असता जांबोटीजवळ घडली दुर्घटना : घटनेने एकच हळहळ
प्रतिनिधी/ बेळगाव
स्विमिंगपूलमध्ये बुडून खासबाग येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जांबोटीजवळील एका रिसॉर्टमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली असून मित्रांसमवेत सहलीला गेला असता ही घटना घडली आहे. खानापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महांतेश अशोक गुंजीकर (वय 25, रा. मारुती गल्ली, खासबाग) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो हिंदवाडी येथील एका खासगी कंपनीत काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. या घटनेची माहिती समजताच खासबाग येथील महांतेशचे कुटुंबीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या घटनेने त्यांना धक्का बसला आहे. उपलब्ध माहितीनुसार एका खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी खानापूर तालुक्यातील जांबोटीजवळील एका रिसॉर्टला गेले होते. शनिवारी मुक्काम केल्यानंतर रविवारी दुपारच्या जेवणाच्यावेळी महांतेश स्विमिंगपूलमध्ये उतरला होता. त्याचे इतर मित्र जेवण करीत होते. तो बुडाल्याची माहिती मिळताच मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढले.
त्याला तातडीने कारमधून जांबोटी येथील इस्पितळात आणण्यात आले. तेथून सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. सिव्हिलला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांशी संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास त्याचे आई, वडील, भाऊ व इतर नातेवाईक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच महांतेशच्या आईने सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात एकच आक्रोश केला. मित्रांसमवेत सहलीला जाणार असे सांगून शनिवारी तो घरातून गेला होता. रिसॉर्टवर काय झाले आहे? आम्हाला माहिती नाही, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी महांतेशच्या आईने केली आहे. खानापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलीस बेळगावात दाखल झाल्यानंतर सोमवारी उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश
अचानक महांतेशच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. नेमके काय झाले आहे? सत्य परिस्थिती सांगा, अशी मागणी करीत कुटुंबीयांनी त्यांच्या मित्रांवर आरडाओरड केली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.









