क्षेत्र पेरणीबिना पडून राहणार असल्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
मसूर : यंदा मे महिन्याच्या मध्यावरच पावसाला सुरुवात झाल्याने शेतीची पेरणीपूर्व कामे रखडली होती. त्यानंतर सातत्याने जूनचा पूर्ण महिना कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा मात्र सततच्या पावसाने त्रासला आहे. यंदा सुमारे ५० टक्के खरीप पेरणी लायक क्षेत्र नापेर राहते की काय अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
मे महिन्याच्या अंतिम टप्यात किंवा जूनमध्ये होणाऱ्या आडसाली ऊस लागणी अंतिम टप्यात आल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी सततच्या पावसाने शेतीची कामे रखडली आहेत. पावसाने वेळोवेळी उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सरीवर टोकण केलेल्या पिकांची चांगली उगवण झाली असल्याचे दिसून येत आहे. मात्र सततच्या पावसाने काही जमिनीच्या क्षेत्राला योग्य वापसा नसल्याने ते क्षेत्र पेरणीबिना पडून राहणार असल्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
यावर्षी एप्रिल व मे महिन्याच्या मध्यापर्यंत उन्हाळी पाऊस झाला नव्हता. मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाने सर्वत्र हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे रखडली होती. सलग आठ-दहा दिवस पडलेल्या पावसानंतर काही दिवस पावसाने थोडीशी विश्रांती दिली होती. त्यामध्ये पेरणीपूर्व मशागती शेतकऱ्यांनी उरकून घेतल्या होत्या.
ज्या ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करायची होती, ती कामेही शेतकऱ्यांनी उरकली होती. तर आडसाली उसासाठी सरी सोडण्याची कामे काही शेतकऱ्यांनी पूर्ण करून घेतले होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उसाची कांडी लागण किंवा रोपांची लागण पूर्ण केली आहे. तर सरीच्या मध्यावर घेवडा, भुईमूग आदीसह विविध प्रकारची कडधान्ये टोकली होती. त्या पिकांची टोक उगवण सध्या चांगल्या पद्धतीने झाली आहे.
जमिनीला जसा वापसा मिळेल तसा पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने त्यांच्या शेतीची मशागतच अद्याप बाकी असल्याने या शेतीत ऊस लागण किंवा खरीप पेरणी करता येणार नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. आगाप पेरणी, टोकणी झालेल्या पिकांची उगवण क्षमता चांगली असून ती पिके सध्या जोमात आहेत. मात्र जादा पावसाने पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.
… तर बळीराजाला मोठा आर्थिक फटका
“सातत्याने पडणारा पाऊस असाच पडत राहिला तर शेकडो एकर क्षेत्र पेरणी बिना राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. काही क्षेत्रात जमिनीला बापसा नसल्याने पेरणी, उसाची लागण, किंवा इतर पिकेही घेता येणार नाहीत. त्याचा बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.”
– संदीप जाधव, शेतकरी हेळगाव








