रब्बीसाठी 3.37 लाख हेक्टरात पेरणीचे उद्दिष्ट, 29 हजार क्विंटल बियाणांचा साठा
बेळगाव : पावसाअभावी यंदा पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यंदाचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे येत्या रब्बी हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा आहेत. मागील दोन दिवसांपासून परतीच्या पावसाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीकडे वळले आहेत. रब्बी हंगामात विशेषत: जोधळा, मका, गहू, हरभरा, भुईमूग आणि सोयाबिनची पेरणी होणार आहे. यासाठी कृषी खात्याने देखील बी-बियाणे आणि खतांचा योग्य तो साठा केला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी कृषी खात्याने यंदा 3.37 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी 29 हजार 500 क्विंटल बी-बियाणांचा साठा केला आहे. रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघामध्ये ही बियाणे उपलब्ध करण्यात आली आहेत.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 7.10 लाख हेक्टरपैकी 6.32 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. मात्र पावसाअभावी अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. फळधारणेच्या अवस्थेतच पाऊस गेल्याने सुका दुष्काळ निर्माण झाला आहे. दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षणाचे काम कृषी खात्याने हाती घेतले आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. आता रब्बी हंगांमासाठी 3.37 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेषत: जोंधळा, मका, गहू, हरभरा, भुईमूग, सोयाबिन आदी पिकांची पेरणी होणार आहे. मात्र काही भागात जनावरांना लम्पी रोगाची लागण होवू लागली आहे. त्यामुळे पेरणी कामावर परिणाम होत आहे.
गतवर्षीच्या भरपाईपासून शेतकरी वंचित
2022-23 सालात खरीप हंगामात 3.45 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. मात्र त्यापैकी 2 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. पिक विमा देखील शेतकऱ्यांनी केला होता.
संबंधित रयत केंद्रात बियाणे उपलब्ध
समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. आता काही ठिकाणी परतीच्या पावसाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. यासाठी 29 हजार क्विंटल बियाणांचा साठा करण्यात आला आहे. संबंधित रयत संपर्क केंद्र आणि पीकेपीएस संघांमध्ये हा साठा उपलब्ध असल्याचे कृषी खात्याचे शिवनगौडा पाटील यांनी सांगितले.









