अध्यक्ष निवडीनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल अपेक्षित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेसमधील राष्ट्रीय अध्यक्ष निवडीनंतर आता पक्षात पदांसाठीच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 26 ऑक्टोबर रोजी औपचारिकपणे पदभार स्वीकारतील. यासोबतच ते काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवरही मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर खर्गे काँग्रेस वर्किंग कमिटीसह (सीडब्ल्यूसी) अनेक विभागांमध्ये सुधारणा करतील. याशिवाय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्येही (एआयसीसी) बदल केले जातील. सरचिटणीस आणि सचिवांची नवी टीम ठरविण्यावर सध्या विचारमंथन केले जात असल्याचे समजते. सध्या महासचिव पदाची जबाबदारी के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे आहे. मात्र, पक्षाध्यक्ष दक्षिण भारतातील असल्याने महासचिव पद उत्तर भारतीय नेत्याकडे दिले जाऊ शकते, अशी चर्चा सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे.
वर्षअखेरीस अधिवेशन शक्य
नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या वर्षाच्या अखेरीस एआयसीसीचे पूर्ण अधिवेशन बोलवू शकतात, अशी शक्मयता वर्तवली जात आहे. विशेष बाब म्हणजे यादरम्यान ‘सीडब्ल्यूसी’च्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत 12 सदस्य निवडले जाणार आहेत. ‘एआयसीसी’चे सुमारे 1400 सदस्य ‘सीडब्ल्यूसी’ सदस्यांची निवड करतील. ‘सीडब्ल्यूसी’ निवडणुकीत आपल्या समर्थकांची टीम भक्कम करण्यासाठी खर्गे ‘एआयसीसी’च्या उच्च पदांवरही नियुक्त्या करणार असल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर्गत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये 23-सदस्यीय ‘सीडब्ल्यूसी’ महत्त्वाची भूमिका बजावते. या समितीचे 12 सदस्य निवडले जातील. तर, 11 जणांना नामनिर्देशित केले जाईल.
राहुल गांधीही दिल्लीत येणार
कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी असलेले राहुल गांधीही मधल्या कालावधीत दिल्लीत येण्याच्या तयारीत आहेत. खर्गे यांचा पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दिल्लीला जाण्यासाठी ते ‘भारत जोडो’ यात्रेत दोन दिवसांचा ब्रेक घेणार असल्याचे सांगण्यात आले.









