10 कि.मी.वर उसळला जनसागर, मोदी..मोदींच्या जयघोषणाने परिसर दणाणला, पुष्पवृष्टीचा वर्षाव, शहर भगवेमय, सर्वत्र उत्साही स्वागत
बेळगाव ; मोदी… मोदी…. मोदी…. जयघोष करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोड शो’ला बेळगावच्या जनतेने उदंड प्रतिसाद दिला. कर्नाटकात हा पहिलाच ‘रोड शो’ असून आतापर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये त्यांनी ‘रोड शो’ केला नाही. मात्र बेळगावात रोड शो केल्यामुळे बेळगावची जनता अक्षरश: भारावून गेली होती. मोदी मोदी म्हणत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मोदींच्या आगमनामुळे आणि ‘रोड शो’ मुळे संपूर्ण शहर भगवामय झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्य जनतेला हात उंचावून साऱ्यांचीच मने जिंकली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुफान गर्दी आणि पुष्पवृष्टी होताना दिसत होती. लहान मुलांसह वृद्धांपर्यंत साऱ्यांनीच मोदींना पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगावमध्ये येणार आणि ‘रोड शो’ करणार असल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून त्याची जोरदार तयारी सुरू होती. तब्बल 10 कि.मी. ‘रोड शो’ होणार असल्याने पोलिसांनी आणि महानगरपालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडस् उभे केले होते. बॅरिकेडस्च्या आतच थांबून मोदींना पहावे लागणार होते. त्यामुळे दुपारपासून अनेकजण भर उन्हात उभे राहून मोदींची वाट पहात होते. पोलिसांनीही सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
शिमोगा येथून दुपारी 2.50 वाजता नरेंद्र मोदी यांचे बेळगावात आगमन झाले. त्यानंतर एपीएमसी पासूनच त्यांनी रोडशोला सुरूवात केली. काळ्यारंगाच्या वाहनांमधून मोदी उभे राहून साऱ्यांना हात उंचावून पुढे जात होते. मोदी जसे पुढे जात होते तसे त्यांचे चाहते देखील पुढे पुढे जात होते. महिलांसह नागरिकांनीही मोदी दाखल होताच एकच जयघोष केला. शहराच्या प्रत्येक चौकामध्ये सारेच पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. सर्वत्र कडेकोट बंदोबस्तात ते पुढे पुढे जात होते. रक्षकही त्यांच्या वाहनांसोबत धावत होते. पोलिसांची वाहने प्रथम ‘रोड शो’ करत असलेल्या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पुढे पुढे जात होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा निघत होता. रस्त्यावर दोन्ही बाजूला भर उन्हात चाहते उभे राहिले होते. याचबरोबर अनेक ठिकाणी गॅलरी तसेच घरामधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी होताना दिसत होती. या पुष्पवृष्टीमुळे वाहनांवर अक्षरश: खच पडत होता. पुष्पवृष्टीचा तो खच रक्षक बाजूला काढत होते. रस्त्यावर अक्षरश: फुलांच्या पाकळ्यांचा थर साचला होता. लहानांसह मोठे सारेच ‘मोदी… मोदी…’ यांचा जयघोष करताना दिसत होते.
मोदींनी पांढरा कुर्ता आणि त्यावर निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले होते. काळ्या रंगाच्या कारमधून ते बाहेर पडून हात उंचावत होते. एपीएमसी येथून या ‘रोड शो’ला सुरूवात झाली. कित्तूर चन्नम्मा, कॉलेज मार्ग, धर्मवीर संभाजी चौक, टिळक चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर ओव्हर ब्रिज, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, त्यानंतर शहापूरमधून, जुना धारवाड रोड मार्गे येडियुराप्पा रोडवरील सभेच्या ठिकाणी ते दाखल झाले. तब्बल 10 कि.मी.चा हा ‘रोड शो’ पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. तब्बल सव्वातास हा ‘रोड शो’ झाला. संपूर्ण वेळ नरेंद्र मोदी यांनी हात उंचावत होते. इतका वेळ वाहनांमध्ये उभे राहून नाकरिकांना हात उंचावून दाखवत होते. यामुळे सारेच आश्चर्यचकीत झाले होते. भगव्या टोप्या, भगवे फेटे आणि भगवे ध्वज घेऊन जयघोष होताना दिसत होता. मोदींच्या स्वागतासाठी विविध चौकांमध्ये भगवे ध्वज तसेच भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. याचबरोबर भाजपचे ध्वजही बऱ्याच ठिकाणी लावण्यात आले होते. एकूणच मोदींच्या ‘रोड शो’ने सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
विविध जिल्ह्यांतून बेळगावात नागरिक दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावात ‘रोड शो’ करणार आहेत, याची माहिती मिळताच बेळगावबरोबरच इतर जिल्ह्यांतून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील शिरगुप्पी गावातून मोदींचे समर्थक आले होते. त्यांनी 2014 मध्ये मोदींच्या गुजरात येथील घरी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी मोदींची माता हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला होता. त्याचे छायाचित्र घेऊनन ते दाखल झाले होते. त्या कार्यकर्त्यांनी तब्बल 1300 कि.मी. आम्ही पदयात्रा काढून त्यांची भेट घेतलो, असल्याचे बसाप्पा अडव्याप्पा संती यांनी सांगिलते. या पदयात्रेमध्ये आम्ही तिघे मित्र सहभागी झालो होतो असे सांगून नरेंद्र मोदी यांच्या माता हिराबेन यांनी आमचे त्या ठिकाणी स्वागत केले होते. मी मोदींचा चाहता असून त्यांच्यासाठीच मी येथे आलो असल्याचे सांगत मला एकदा नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठमोळ्या पध्दतीने पंतप्रधानांचे स्वागत

टाळ, मृदंग आणि तुतारी वाजवत मराठमोळ्या पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत अनेक युवा कार्यकर्ते आणि तरुण करत होते. भगवे फेटे परिधान करुन तुतारी वाजवत रोड शोच्यावेळी मोदींचा जयघोष करण्यात आला. तालुक्यातील अनेक गावातील मोदी प्रेमी कार्यकर्त्यांनी आगळ्यावेगळ्या पध्दतीने रोड, शोच्यावेळी स्वागत केले.
पंतप्रधानांनी म्हादईवर भाष्य टाळले
पंतप्रधानांनी म्हादईवर भाष्य टाळले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकात बेळगाव येथे निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आले होते खरे परंतु साऱ्या गोमंतकीयांचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागून होते. तथापि, पंतप्रधानांनी म्हादई संदर्भात अवाक्षरदेखील काढला नाही. याच महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथील सभेत म्हादईसंदर्भात जी काही निवेदने केली होती त्यातून त्यांनी कर्नाटकाला म्हादईचे समर्थन दिले होते. आता पंतप्रधान देखील म्हदाईबाबत काहीतरी बोलतील, अशी जनतेला अपेक्षा होती. परंतु गोव्याचा प्रचंड आणि प्रखर विरोध लक्षात घेता पंतप्रधानांनी यावर भाष्य करण्याचे टाळले.









