हजारो भाविकीं उपस्थिती, लक्ष्मीदेवी मिरवणूक, आज बिरदेव पालखी सोहळा

वार्ताहर /सांबरा
भंडाऱयाची उधळण करत व श्री लक्ष्मीदेवीचा जयजयकार करत खनगाव खुर्द (ता. बेळगाव) येथील श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रा महोत्सवामध्ये बुधवारी हजारो भाविकांनी भाग घेतला होता. तब्बल 17 वर्षानंतर श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यात्राकाळात हजारो भाविकांची उपस्थिती राहील, असा अंदाज आहे. बुधवार दि. 8 रोजी पहाटे सूर्योदयाला 5 वाजून 54 मिनिटांनी अक्षतारोपण होऊन श्री लक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा पार पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यानंतर लक्ष्मीदेवीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी हक्कदारांच्या घरी मिरवणूक गेली असता तेथे ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवीची घरोघरी ओटी भरण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचाही समावेश होता. भंडाऱयाची उधळण करत लक्ष्मीदेवीचा जयजयकार करण्यात येत होता. मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. रात्री आठ वाजता देवीला गदगेवर स्थानापन्न करण्यात आले. रात्री साडेदहा वाजता सामाजिक कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. नाटक पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. गुरुवारी दिवसभर गावामध्ये बिरदेव पालखी सोहळा होणार आहे.
शिवलीलाताई पाटील यांच्या प्रवचनाचा आज कार्यक्रम

श्र् ााr लक्ष्मीदेवीच्या यात्रेनिमित्त गुरुवार दि. 9 रोजी रात्री आठ वाजता समाज प्रबोधनकार, प्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार शिवलीलाताई पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोकाक रोड खनगाव खुर्द येथील बसवेश्वर मंदिरसमोर रात्री आठ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे.









