जळगाव / प्रतिनिधी :
अंमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची थीम ही खान्देशी बोलीभाषा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर असेल, असे मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी अंमळनेर येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
तब्बल 72 वर्षानंतर अंमळनेरात अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. प्रताप कॉलेजने या बाबत मोठी जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली असून संमेलनाचे स्थळ हे प्रताप महाविद्यालय निश्चित करण्यात आले आहे. संमेलन नियोजनाबाबत विचार सुरू झाला असून, येणारे प्रतिनिधी व उपलब्ध जागा यांचा विचार झाला. अंमळनेरातील हॉटेलमध्ये 100 रूम उपलब्ध होत असून कार्यालयामध्ये 2000 पर्यंत प्रतिनिधींची उतरण्याची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे काही जणांची उतरण्याची व्यवस्था ही धुळयास करावी लागण्याची शक्यता आहे. भोजनात पंचपक्वानाऐवजी खान्देशी मेनू असणार आहे तर खान्देशी बोली भाषा व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर संमेलनाची थीम असेल.
संमेलनाच्या खर्चाचा विचार करता जिल्हयातील लोकप्रतिनिधी, विविध शैक्षणिक संस्थांचे सहकार्य घेण्यात येईल. अंमळनेरातून बाहेर गेलेल्या उच्चपदस्थांचे देखील सहकार्य घेण्यात येणार असून, ऑक्टोबरपर्यंत अंतिम नियोजन करण्यात येईल असे डॉ. जोशी यांनी सांगितले.








