निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक समितीचे खच्चीकरण : फलक जप्त केल्याने संताप
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालयावरील फलकावर निवडणूक अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे समिती कार्यकर्त्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद या जाणीवपूर्वक समितीचे खच्चीकरण करण्यासाठी वारंवार कारवाई करत आहेत. तसेच समितीच्या उमेदवारास नाहक त्रास देत असल्याचा आरोप यावेळी समिती नेत्यांकडून करण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यालय बेळगाव-गोवा रस्त्यावर महिन्यापूर्वी रितसर परवानगी घेऊन सुरू करण्यात आले. कार्यालयासमोर पहिल्यांदा मोठा फलक लावण्यात आला होता. मात्र निवडणूक अधिकाऱ्याने आकारावर आक्षेप घेत फलक काढण्यास भाग पाडले. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांनी दिलेल्या आकारात रीतसर परवानगी घेऊन फलक लावण्यात आला होता. त्यानंतर निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी हा फलक काढण्यासंबंधी कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठविले. मात्र कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे हा फलक काढता आला नव्हता. मात्र मंगळवारी दुपारी 1 वाजता अनुराधा वस्त्रद यांनी मोठा फौजफाटा नियुक्त करून तसेच निवडणुकीत कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठवून हा फलक जबरदस्तीने काढण्याचे कारवाईचे आदेश दिले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, माजी आमदार दिगंबर पाटील, नारायण कापोलकर, कृष्णा कुंभार, गोपाळ पाटील, विठ्ठल गुरव, विनोद पाटील, अर्जुन देसाई यांसह इतर कार्यकर्त्यांनी फलक काढण्यास विरोध केला.
य् ाावेळी कारवाई करण्यास विरोध केल्यास बळाचा वापर केला जाईल, यासाठी समिती कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. त्यामुळे समिती कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात तसेच कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात घोषणा देत रास्तारोको केला. कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी, निवडणूक अधिकारी वस्त्रद यांनी देलेली परवानगी दाखविली. मात्र कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत फलक काढला. त्यावेळी समिती कार्यकर्त्यांनी फलक समिती कार्यालयात नेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र कारवाईसाठी आलेले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वठारे यांनी फलक जप्त करण्याचा आदेश असल्याचे सांगत जप्त करून निवडणूक कार्यालयात नेण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद या निवडणुकीचे कामकाज सुरू झाल्यापासून जाणीवपूर्वक समितीबाबत आकसाची भूमिका बजावत आहेत. अनेकवेळा मराठीचा द्वेष त्यांच्या आचरणातून दिसून येत आहे. तसेच निवडणूक चिन्ह वाटपावेळी ट्रॅक्टर चिन्ह उपलब्ध असताना जाणीवपूर्वक ते चिन्ह नाकारण्यात आल्याचे यशवंत बिरजे यांनी सांगितले. वस्त्रद यांची एकूण कार्यपद्धत पाहता समितीच्या उमेदवाराबाबत दडपशाहीचे धोरण अवलंबत आहेत. राष्ट्रीय पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचे दिसून येत आहे, असाही आरोप समिती कार्यकर्त्यांनी केला आहे.
मराठी भाषिकांनी या भूमिकेचा जरूर विचार करावा
य् ााबाबत बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, रितसर परवानगी घेऊन निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आकारात फलक लावलेला असतानाही फलक काढण्यासाठी बळाचा वापर करून समिती कार्यकर्त्यांत भीतीचे व दबावाचे वातावरण निवडणूक अधिकारी करत आहेत. याबाबत निश्चितच न्यायालयात दाद मागण्यात येईल. तसेच मराठी भाषिकांनी राष्ट्रीय पक्षांच्या मराठीबाबतच्या भूमिकेचा विचार करावा आणि समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
न्यायालयात दाद मागणार
समिती कार्यकर्ते अॅड. केशव कळळेकर म्हणाले, मी समितीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. समितीच्या फलकावर झालेली कारवाई अत्यंत क्लेशदायक असल्याने मी वकील या नात्याने तसेच मराठीचा रक्षक म्हणून वैयक्तिक निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.
‘त्या’ घटनेच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
खानापूर येथील म. ए. समिती कार्यालयावरील म. ए. समितीचा फलक तब्बल सहावेळा हटविण्यात आला. मराठी भाषिकांना त्रास देण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सुरूच ठेवला आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्याबद्दल तक्रार दाखल करणार असल्याचे अॅड. महेश बिर्जे यांनी स्पष्ट केले आहे. खानापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी म. ए. समितीच्यावतीने कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्याठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती, खानापूर असा फलक लावण्यात आला. त्या फलकावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अनेकवेळा कारवाई केली. ही एक संघटना असून अशाप्रकारे निवडणूक काळात दडपशाही करणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. त्यामुळे याबद्दल निवडणूक आयोगांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.









