रविंद्र हादीमणी यांनी तात्पुरता पदभार स्वीकारला : गायकवाड यांच्या बदलीमुळे तालुक्यात समाधान
खानापूर : खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांचे अखेर निलंबन करण्यात आले असून, त्यांना धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू असून, त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता मिळवल्याप्रकरणी फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त आणि भ्रष्टाचाऱ्याचा कळस गाठणारा ठरला आहे. गायकवाड यांच्या बदलीने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या विरोधात बेंगळूर लोकायुक्तांकडे बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन लोकायुक्तांनी दि. 8 जानेवारी 2025 रोजी प्रकाश गायकवाड यांच्या निवासस्थानासह नातेवाईकांच्या घरावर एकाचवेळी छापे मारुन पडताळणी केली होती. या पडताळणीत सुमारे 4 कोटीची बेहिशेबी तसेच उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता कमवल्याचे लोकायुक्तांच्या धाडीत स्पष्ट झाले होते.
प्रकाश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंद
प्रकाश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शासनाने याची दखल घेऊन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय तसेच फौजदारी गुन्ह्याद्वारे चौकशी करण्यात येत आहे. सध्या त्यांची तात्पुरती बदली धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात करण्यात आली आहे. गायकवाड यांच्या जागी रविंद्र हादीमणी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे तहसीलदारपदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. हादीमणी यांनी सोमवारी सायंकाळी खानापूर तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहून पदभार स्वीकारला आहे.
कायद्याची भीती दाखवून जमिनी हडप केल्याची प्रकरणे उघड
तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या कार्यकाळात तहसीलदार कार्यालयात भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. शेतकऱ्यांच्या सामान्य कामासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरुन आर्थिक पिळवणूक करण्यात येत होती. तसेच जमिनीच्या कामासबंधी तहसीलदार कार्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांकडून कायद्याची भीती दाखवून जमिनीही हडप केल्याची प्रकरणे घडलेली आहेत. तसेच अंत्यत कवडीमोल दरात जमीन लाटल्याच्याही घटना घडलेल्या असल्याने प्रकाश गायकवाड यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच प्रकाश गायकवाड यांच्या कार्यकाळात काही भुमाफीयानी सरकारी जमिनीवर ताबा मिळवलेला आहे. मात्र तहसीलदारांकडून या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या विरोधात तालुक्यातील नागरिकांतून असंतोष पसरलेला होता.









