आतापासूनच नियोजनाची गरज, कूपनलिका-नैसर्गिक जलप्रवाहाची पातळी घटली, टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यात मागीलवर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच नदी नाल्यांची पाणी पातळी पूर्णपणे कमी झाली असून अनेक ठिकाणी नदी-नाल्यांचे पात्र कोरडे पडले आहेत. तसेच काही दिवसांपासून वाढते उष्णतामान तसेच खालावलेली भूजल पातळी यामुळे तालुक्यात यावर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. परिणामी तालुक्यातील बऱ्याच गावांतून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील जवळजवळ सर्वच गावांना गेल्या काही वर्षात नळपाणीपुरवठा योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये पश्चिम भागातील काही गावांचा पाणीपुरवठा नैसर्गिक जलप्रवाहावर अवलंबून आहे. तर नदीकाठच्या 30 ते 40 गावांना नदीतील पाण्यावर नळपाणीपुरवठा योजना करण्यात आल्या असून बहुतांशी गावचा पाणीपुरवठा हा कूपनलिकेतील पाण्यावरच अवलंबून आहे. मागीलवर्षी पाऊसच झाला नसल्याने यावर्षी जानेवारीपासून नदी-नाले कोरडे पडल्याने तसेच कूपनलिकेतील भूजल पातळीही कमी झाल्याने नदी-नाल्यातील पाण्यावर विसंबून असलेल्या गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मार्च, एप्रिल, मे, जून पुढील चार महिने उन्हाचा तडाखा आणि भीषण पाणीटंचाईचा जनतेला सामना करावा लागणार आहे.
डिसेंबरपासूनच नदी-नाल्यांची पाणीपातळी खालावली
मागीलवर्षी एकदाही वळीव पाऊस झालेला नव्हता. तसेच पावसाळ्यातही पावसाने हात दिल्याने यावर्षी डिसेंबरपासूनच तालुक्यातील नदी-नाल्यांची पाणी पातळी पूर्णपणे खालावली आहे. यावर्षीही मार्च महिना सुरू झाला. तरीही वळीव पावसाने हजेरी लावलेली नाहे. सध्याचे वातावरण पाहता वळीव पाऊस होण्याची शक्यता दुरावली आहे. दिवसभर कडक उन्ह आणि प्रचंड उष्णता, रात्री आणि पहाटे गारठा पडत असल्याने वळिवाचा पाऊस होणार नसल्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. त्यामुळे याचा गंभीर परिणाम येत्या काही दिवसात सोसावा लागणार आहे.
काही ठिकाणच्या कूपनलिका पूर्णपणे बंद
तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक गावात नैसर्गिक जलप्रवाहावर जनजीवन अवलंबून आहे. हा नैसर्गिक प्रवाहदेखील अनेक गावांतून बंद झाल्याने त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांनाही आता तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच भूजल पातळी कमी झाल्याने अनेक गावातील कूपनलिकांमधील पाण्याचे स्त्रोतही कमी झाले आहे. तर काही ठिकाणच्या कूपनलिका पूर्णपणे बंद झाल्याने त्या गावांनाही आता भीषण पाणीटंचाई सहन करण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवीन कूपनलिका मंजूर करणे गरजेचे आहे.
पश्चिम भागासह सर्व ठिकाणी पाणी जिरवा योजना आवश्यक
यामुळे पुढील काही दिवसांत वळिवाची गरज आहे. त्यातच तालुक्यातील पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवण्याच्या कोणत्याही योजना नसल्यामुळे त्या भागातील पावसाचे पाणी नदी-नाल्यांद्वारे वाहून जात आहे. याकरिता तालुक्यामध्ये पश्चिम भागासह सर्व ठिकाणी पावसाचे पाणी जिरवण्यासाठी योजना सुरू करून त्या यशस्वी केल्या तरच निदान यापुढील काळात तरी होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येऊ शकेल. खानापूर शहरातही यावर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. नगरपंचायतीकडून कूपनलिकाद्वारे योग्य नियोजन केल्यास पाणीटंचाई दूर करणे शक्य होणार आहे. यासाठी नगरपंचायतीने आताच लक्ष घालून नियोजन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखली जाणाऱ्या आमगावलाही भीषण पाणीटंचाई
तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी-कणकुंबी भागात सर्वाधिक पाऊस पडून देखील त्या भागातील काही गावे उन्हाळ्यात पाण्यासाठी तहानलेली असतात. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येते. आमगावसारख्या गावात वर्षाकाठी तीनशे ते साडेतीनशे इंच पाऊस पडतो. त्यामुळे आमगावला बेळगाव जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखली जाते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद होणाऱ्या आमगावला देखील यावर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. या शिवाय वडगाव, जांबोटी, हब्बनहट्टी, आमटे, माण, हुळंद, गवसे, कणकुंबीसह अनेक गावात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. तालुक्यात जलजीवन मिशनची कामेही अर्धवट स्थितीत आहेत. ती पूर्ण करणे गरजेचे आहे.









