लग्नाच्या वाढदिवस कार्यक्रमात भाजप पदाधिकारी हजर झाल्याने समाजाच्या नागरिकांतून नाराजी
खानापूर : खानापूर तालुका वीरशैव लिंगायत समाजाने काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतची माहिती वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. काही लिंगायत समाजाच्या नेत्यांनी दिशाभूल करून भाजपला पाठिंबा देण्याचे षड्यंत्र रचले होते. मात्र भाजपने लिंगायत समाजाचा विश्वासघात केला असल्याने आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करत आहोत, असे अध्यक्ष संगमेश वाली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तालुक्यातील लिंगायत समाजाचे स्वयंघोषीत नेते मोहन संबरगी यांनी नुकताच आपल्या लग्नाचा 44 वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने तालुक्यातील लिंगायत समाजाचा मेळावा हिरेमुन्नवळी येथे ठेवला होता. मेळाव्यात सर्व लिंगायत समाजबांधव व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाढदिवसाचा सोहळा साजरा होत असताना अचानक त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर, खासदार इराण्णा कडाडी व खासदार मंगला अंगडी हे व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यामुळे सर्वच समाजबांधव बुचकळ्यात पडले. यावेळी भाजपच्या नेत्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर करण्याचे वक्तव्य केल्याने समाजबांधवांमध्ये नाराजी व संताप व्यक्त करण्यात आला. त्याचवेळी अचानक निवडणूक अधिकारी व पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. त्यामुळे पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आला. पोलिसांनी स्वयंपाक जप्त करण्याची कारवाई सुरू केली. मात्र आम्ही पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून पोलिसांना कारवाईपासून रोखले. भाजपचे हे कुटील कारस्थान आम्हास खेदजनक आहे. समाजाच्या व्यासपीठावर राजकारण आणण्यासाठी खोटे नाटक केल्याने समाज बांधवांमध्ये भाजपच्या बाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येकाने आपापल्या मर्जीने राजकारणात सहभागी व्हावे, मात्र समाजाच्या व्यासपीठावर राजकारण आणू नये, असे असताना भाजपने हा कुटील डाव रचून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे चंब्बाण्णा होसमणी सांगितले.
वीरशैव समाजाला टू ए चे तोंडी आरक्षण अमान्य
भाजपने लिंगायत समाजावर कायमच अन्याय केलेला आहे. तसेच वीरशैव लिंगायत समाजाचा टुए वर्गात समावेश करण्यासाठी बेंगळूर येथे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी तोंडी आरक्षण जाहीर करून लिंगायत समाजाच्या तोंडावर पाणी पुसले होते. तसेच राज्यातील ज्येष्ठ आणि ज्यांचा भाजप उभारणीत मोठा सहभाग असलेल्या लिंगायत समाजाच्या नेत्यांना जाणीवपूर्वक पक्षाच्या बाहेर ठेवण्याचे काम केले आहे. यामुळे राज्यातील वीरशैव समाजही भाजपच्या विरोधात आक्रमक झाला आहे. काँग्रेसच्या सर्वसमावेशक धोरणांचा विचार करून आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करत आहोत, असे मत यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. य् ाावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते चंबाण्णा होसमणी, रुद्राप्पा कंकूर, महांतेश संबरगी, जगदीश हुलीमणी, रमेशगावडा पाटील, अदृष्य गळगी, महांतेश लंगोटी, बाबुराव पाटील, बी. वाय. तुरीमुरी, देमाण्णा मुतगी, डॉ. एम. बी. वाली, संतोष हंजी, महांतेश राऊत, महांतेश कल्याणी यासह तालुक्यातील लिंगायत समाजाचे नेते उपस्थित होते.









