खानापूर : कर्नाटक सरकारच्यावतीने राज्यात जातीय जनगणना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या नागरिकांनी जातीनिहाय जनगणनेवेळी पोटजातीच्या रकाण्यात कुणबी म्हणून नोंद करावी, असे आवाहन शिवस्मारक येथे घेण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले. तालुक्यात प्रत्येक मराठा माणसापर्यंत याबाबत माहिती देण्यासाठी तालुक्यात जागृती अभियान राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सुरुवातीला आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक करून कर्नाटक सरकारच्यावतीने करण्यात येणाऱ्या जात जनगणनेसंदर्भात राज्य मराठा संघटनेच्यावतीने जातीच्या रकाण्यात कुणबी जात नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही माहिती प्रत्येक मराठा समाजाच्या व्यक्तीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. यासाठी बोलावलेल्या बैठकीत चर्चा करून तालुक्यातील मराठा समाजात जागृती करण्यासाठी निर्णय घेण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार दिगंबर पाटील यांनी तालुक्यात मराठा समाजाच्यावतीने प्रत्येकाने कुणबी म्हणून नोंद करावी, तसेच मातृभाषेच्या रकाण्यात मराठी म्हणून नेंद करावी, असे आवाहन केले. तर माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, तालुक्यातील सर्व मराठा समाजातील युवकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा मनात संकोच न बाळगता कुणबी म्हणून नोंद करावी, त्यामुळे भविष्यात मुलांना फायदा होऊ शकेल. अॅड. ईश्वर घाडी यांनी कायदेशीर मार्गदर्शन घेऊन तालुक्यात जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी अर्थसाहाय्य तसेच इतरही सहकार्य करून तालुक्यात तातडीने जागृती अभियान राबविण्यात यावे, असे सांगितले.
यावेळी दिलीप पवार, अॅड एच. एन. देसाई, प्रकाश चव्हाण, अनंत गुरव, दशरथ बनोशी, संजय कुबल, महेश गुरव, अनिल पाटील, अभिजीत सरदेसाई, विनायक मुतगेकर, मुरलीधर पाटील, गोपाळ देसाई, राजू पाटील यांची भाषणे झाली. 22 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत जनगणना करण्यात येणार आहे. यासाठी जनगणना सुरू होण्याच्या पूर्वीच जागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या अभियानात सामावून घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील महिलांनी जनगणनेबाबत सतर्क रहावे, तसेच जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊनच माहिती देण्यात यावी आणि अर्ज योग्यरीतीने भरलेला आहे की नाही, याची खातरजमा करून घेण्यात यावी, असेही बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीला तालुक्यातील मराठा समाजाचे सर्व पक्षीय नेते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









