खानापूर ; खानापूर तालुका भाजपच्यावतीने सोमवार दि. 11 सप्टेंबर रोजी काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार आहे. खानापूर तालुका भाजपच्यावतीने राज्य रयत मोर्चाचे अध्यक्ष इराण्णा कडाडी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर शहरात 11 सप्टेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खानापूर तालुका भाजप रयत मोर्चाच्यावतीने विश्रामधामात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकरीविरोधी धोरण अवलंबत आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळजन्य परिस्थिती असतानासुद्धा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच दुष्काळ जाहीर करण्यात दाखवलेली दिरंगाई, शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा नाही. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारे सहाय्यधन रोखण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती सध्याच्या सरकारने थांबवलेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे जीवन हलाखीचे बनले आहे. यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्यावतीने संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून त्याचाच एक भाग म्हणून खानापूर तालुका भाजपतर्फे शेतकऱ्यांचा मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. यात तालुक्मयातील सर्व शेतकरी आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, राजू रायका, महिला मोर्चा आघाडीच्या धनश्री सरदेसाई, प्रकाश तिरवीर, गुंडू तोपिनकट्टी, प्रकाश निलजकरसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









