सहा महिन्यांचा थकीत पगार मिळावा, अन्यथा राज्यभरातील पीडीओ संघटनांचा पाठिंबा देण्याचा इशारा
खानापूर : गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असलेला पगार मिळावा म्हणून, मनरेगा कर्मचाऱ्यांनी सोमवार दि. 7 जुलैपासून राज्यभरात रोहयो कर्मचारी संघटनेने राज्यात काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात खानापूर तालुका रोहयो कर्मचारी सहभागी झाले आहेत. या काम बंद आंदोलनाला पीडीओ कल्याण विकास संघटनेच्या सदस्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त करून रोहयो कर्मचाऱ्यांना तातडीने थकीत वेतन देऊन इतर सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी पीडीओ संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
आंदोलनाना पाठिंबा देताना पीडीओ संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भट यांनी रोहयो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याने कुटुंबांचे पालनपोषण करणे कठीण जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून पगारासाठी आंदोलन सुरू केले असूनदेखील या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने कामगार हतबल झाले आहेत. सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून तातडीने या कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करावे आणि उर्वरित मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा.
पीडीओ संघटनेचे सचिव आनंद भिंगे म्हणाले, आंदोलनाकडे सरकारने पाठ फिरविल्याने रोहयो कर्मचाऱ्यांना वालीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहयो कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे ग्रामीण भागातील विकासकामांची योग्यरीतीने अंमलबजावणी होत आहे. मात्र याच कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगाराविना रहावे लागले आहे. पगार मिळावा म्हणून आंदोलन करुनदेखील शासनाने याची दखल घेतली नसल्याने या कर्मचाऱ्यांना वालीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात यावा, अन्यथा राज्यभरातील पीडीओ संघटना या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, आणि आंदोलनात सहभागी होईल, असे म्हणाले. यावेळी पीडीओ प्रसन्नकुमार, देवराज एम. जी., सागरकुमार बिरादार, चन्नबसयास्वामी कलमठ, निंगप्पा आस्की, सुनील अंबारे यांनी पाठिंबा व्यक्त करणारी भाषणे केली. आंदोलनात तालुक्यातील सर्व नरेगाचे कर्मचारी सहभागी झाले होते.









