खानापूर : कर्नाटक सरकारतर्फे राज्यात जनगणना करण्यात येणार आहे. तालुक्यातील मराठा समाजाच्या नागरिकांनी जातीनिहाय जनगणनेच्यावेळी पोटजातीच्या रकाण्यात कुणबी म्हणून नोंद करावी, असे आवाहन शिवस्मारक येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील यांनी व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते. संजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या जातीय जनगणनेवेळी मराठा समाजाने जागरुकता बाळगावी आणि कुणबी म्हणून नोंद करावी, यासंदर्भात चर्चा करण्यात यावी, असे आवाहन केले.
तालुक्यातील समस्त मराठा समाज बांधवांनी कोणताही संकोच न बाळगता पोटजात कुणबी म्हणून नोंद करावी आणि मातृभाषा मराठी असे स्पष्ट करावे तसेच जनगणनेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे माहिती नमूद केलेली आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी, असे विचार मांडण्यात आले. यावेळी प्रकाश चव्हाण, गोपाळ पाटील, अनंत पाटील, डी. एम. भोसले, पांडुरंग सावंत, रुक्माण्णा झुंजवाडकर यासह इतरांची भाषणे झाली. बैठकीला जयराम देसाई, मारुती परमेकर, कृष्णा मन्नोळकर, रविंद्र शिंदे, अजित पाटील, मुतगेकर गुरुजीसह म. ए. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









