दोन दवाखाने सील : मुगळीहाळ-कर्तनबागेवाडी येथील दवाखान्यांवर कारवाई
खानापूर प्रतिनिधी
तालुक्यातील दोन बोगस डॉक्टरांवर खानापूर तालुका वैद्याधिकाऱ्यांनी धाड टाकून दोन दवाखाने सील केले आहेत. याबाबत खानापूर तालुका वैद्याधिकारी महांतेश किवडसण्ण्णवर यांनी दिलेली माहिती अशी तालुक्यात अनेक बोगस डॉक्टर वैद्यकीय सेवेचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. तालुक्यातील मुगळीहाळ आणि कर्तनबागेवाडी येथील दवाखान्यांवर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली असता या दोन्ही डॉक्टरांकडे वैद्यकीय सेवा देण्याचे कोणतेही परवाने नव्हते. तसेच वैद्यकीय विभागातील कोणत्याच शाखेचे शिक्षण घेतलेले नसल्याचे आढळून आल्याने दोन्ही दवाखाने सील करण्यात आले. तसेच या डॉक्टरांना आपली वैद्यकीय सेवेची प्रमाणपत्रे तसेच वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक असलेले परवाने आणि इतर कागदपत्रे घेऊन सात दिवसांच्या आत तालुका वैद्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. या कारवाईमुळे खानापूर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
संपूर्ण तालुक्यात अनेक विनापरवाना बोगस डॉक्टर आपली प्रॅक्टिस करत आहेत. त्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. यासाठी तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच तालुक्यात कुठेही बोगस दवाखाना सुरू असल्याची माहिती दिल्यास त्या डॉक्टरांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे तालुका वैद्याधिकाऱ्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









