रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमाण्णा यांचे वक्तव्य : हुबळी-दादर रेल्वेला खानापूर येथे थांबण्यास हिरवा झेंडा
खानापूर : खानापूर तालुका अति पावसाचा आणि दुर्गम प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे खानापूरसारख्या दुर्गंम भागातील रेल्वे स्थानकाचाही विकास होणार. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असून, रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचेही काम तातडीने हाती घेण्यात येणार असून कमी वेळात भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. खानापूर रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या रेल्वेना थांबा देण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. त्यातील पहिली गाडी हुबळी-दादर ही सोमवार दि. 15 सप्टेंबरपासून खानापूर येथे थांबा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमाण्णा यांनी रेल्वे स्थानकाच्या विविध विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी आणि हुबळी-दादर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर राज्य सभासदस्य इराण्णा कडाडी, खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष बसवराज सानिकोप, हुबळी विभागीय रेल्वेचे अजय शर्मा आणि बी. आर. मिना यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
विविध विकासकामांचे भूमिपूजन
सुरुवातीला रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमाण्णा यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करून कोनशिला करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात अजय शर्मा यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. विभागीय रेल्वेच्यावतीने व्यासपीठावरील उपस्थितांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना विश्वेश्वर हेगडे म्हणाले, खानापूर रेल्वे स्थानकासह तालुक्याच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अवघ्या वर्षभरात मी आश्वासन दिल्याप्रमाणे भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या आवश्यक असलेल्या विकासकामाना गती देण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून साडेचारशे मीटरचा सेल्टर मंजूर करून घेण्यात आला आहे. याचे कामही सुरू करण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकासाठी आवश्यक असलेल्या सुविधांचीही तातडीने पूर्तता करण्यात येणार आहे. खानापूर येथे थांबा देण्यात आलेल्या हुबळी-दादर एक्स्प्रेसला सायंकाळी 5.55 वाजता रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमाण्णा आणि खासदार विश्वेश्वर हेगडे, इराण्णा कडाडी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हेते.
लांब पल्ल्यांच्या रेल्वेंना काही दिवसांत थांबा
खानापूर तालुका असूनसुद्धा लांब पल्ल्यांच्या रेल्वेना येथे थांबा देण्यात आलेला नाही. तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार मुंबई, दिल्ली, बेंगळूरसह इतर लांब पल्ल्यांच्या रेल्वेना येत्या काही दिवसात थांबा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच वारकरी सांप्रदायासाठी वास्को-पंढरपूर ही रेल्वे कायमस्वरुपी सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करणार आहे. असे ते म्हणाले.









