दोन गुन्हेगारांकडून जवळपास 86 ग्रॅम सोने, 210 ग्रॅम चांदीसह दुचाकी जप्त
खानापूर : खानापूर शहराच्या विविध भागात गेल्या काही महिन्यांपूर्वी बंद घरे फोडून सोन्या-चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लांबवल्या होत्या. याबाबत बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद आणि बैलहोंगल विभागाचे उपअधीक्षक विरय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली खानापूर पोलिसांनी विविध पथकांद्वारे तपास चालविला होता. दीपक ऊर्फ रोहन नागेंद्र मातंगी (मूळचा हलकर्णी-खानापूर सध्या रा. मच्छे), व शिवनागय्या मतय्या उमचगीमठ (मूळचा गुजमागडी-गदग सध्या रा. हुबळी) या दोन गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून जवळपास 86 ग्रॅम सोन्याचे दागिने, 210 ग्रॅम चांदीचे दागिने आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गुन्हा नोंद करून त्यांना खानापूर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आल्याची माहिती खानापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक लालसाब गवंडी यांनी पत्रकारांना दिली.
गेल्या काही महिन्यांपूर्वी वरील गुन्हेगारांनी मराठा मंडळ महाविद्यालयासमोरील रेखा क्षीरसागर, तसेच शिवाजीनगर येथील रहिवासी असलेले राचन्ना चन्नबसप्पा किणगी यांच्या घरांचे कुलूप तोडून सोने व चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती. याबाबत खानापूर पोलिसात गुन्हा नेंद करण्यात आला होता. बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुखांच्या मार्गदर्शनानुसार चोरीच्या तपासासाठी खानापूर पोलिसांची दोन पथके नियुक्त करण्यात आली होती. पोलिसांनी कसून तपास करून दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून 86 ग्रॅम सोन्याचे दागिने, 210 ग्रॅम चांदीचे दागिने आणि दुचाकी जप्त केली आहे. खानापूर पोलिसांनी गेल्या महिन्याभरापासून तपास चालविला होता. चोरांकडून आणखी काही चोऱ्यांचा उलगडा होतो काय, यासाठी पोलीस तपास करीत आहेत. गेल्या महिन्याभरात खानापूर पोलिसांनी विविध चार चोऱ्यांचा तपास लावला असून मुद्देमालही जप्त केला आहे.









