पायाभूत सुविधा-स्वच्छतेला प्राध्यान्य, 3 टक्के करवाढीची तरतूद
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या 2025-26 सालच्या अंदाज पत्रकाबाबतची बैठक नुकतीच नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत 2024-25 सालाच्या अर्थसंकल्पाचे अंदाजपत्रक सादर केले. याला नगराध्यक्षासह सर्वानी मंजुरी दिली आहे. यात तीन टक्के करवाढ करण्यात आली असून रस्ते, गटार, पिण्याचे पाणी, उद्यानाचे व्यवस्थापन यासह इतर पायाभूत सुविधासह विकासकामावर भर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरवातीला अभियंते तिरुपती राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा विषय सभेपुढे मांडला. मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी अंदाजपत्रक सादर केले.
2024-25 या आर्थिक वर्षात सरकारी अनुदान व विविध माध्यमातून नगरपंचायतीला 10 कोटी 49 लाखाचा निधी जमा झाला असून तर स्वच्छतेचा, पाणीपुरवठा यासह विविध विकासकामासाठी 10 कोटी 39 लाखाचे वार्षिक खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले आहे. या अंदाज पत्रकाला सर्वानुमते संमती देण्यात आली. महसूल वाढीसाठी वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सरकारच्या निर्देशानुसार करवाढ करण्यात येते. मात्र शहरातील रहिवाशांच्या विचार करून फक्त 3 टक्के करवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीला उपनगराध्यक्षा जया भुतकी, नगरसेवक नारायण मयेकर, लक्ष्मण मादार, प्रकाश बैलूरकर, मजहर खानापुरी, रफिक वारीमणी, नारायण ओगले, मेघा कुंदरगी, राजश्री तोपिनकट्टी, सायरा सनदी, शोभा गावडे, लक्ष्मी अंकलगी, फातिमा बेपारी आदी उपस्थित होते.









