बैठकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष : विकासांबाबत ठोस कार्यक्रम हाती घेणे गरजेचे
खानापूर : खानापूर नगरपंचायतीची सर्वसामान्य बैठक आज शुक्रवार दि. 7 रोजी दुपारी 3 वाजता नगरपंचायत सभागृहात बोलाविण्यात आली आहे. मिनाक्षी बैलूरकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिलीच बैठक आज होणार असल्याने या बैठकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या साडेसात वर्षाच्या काळात फक्त अडीच वर्षे नगरसेवकांना नगरपंचायतीत काम करण्यासाठी मुभा मिळाली होती. मात्र पाच वर्षे प्रशासक काम पहात होते. गेल्या अडीच वर्षापासून नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून तहसीलदार प्रकाश गायकवाड हे काम पहात होते. या कार्यकाळात शहराच्या अडीअडचणी विकासासंदर्भात आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यात काहीही काम झालेले नाही. शहराचा विकास गेल्या अडीच वर्षापासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारे पाणी सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. हेच पाणी शहराला पुरवण्यात येते. तसेच हॉटेलमधून हेच पाणी वापरण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यावर रहदारीची समस्या फेरीवाले, फळविक्रेते, भाजी विक्रेते यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
विकास आता नगरसेवकांच्या हाती
सर्वसामान्यांच्या घरबांधणीसह इतर कामांच्या बाबतीत होणारा विलंब यासह ठप्प झालेला शहराचा विकास आता नगरसेवकांच्या हाती आला असून, नूतन नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर आणि उपनगराध्यक्षा जया भुतकी आणि सर्व नगरसेवकांनी खानापूर शहराच्या विकासाबाबत ठोस कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. आज होणाऱ्या बैठकीत गेल्या अडीच वर्षापासून ठप्प झालेल्या नगरपंचायतीच्या कामांबाबत बैठकीत चर्चा होऊन चालना देतील का, हीच अपेक्षा शहरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.









