अध्यक्ष गोपाळ देसाईंची घोषणा; निवड समितीचा निर्णय
खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची अधिकृत उमेदवारी भू विकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील यांना घोषित करण्यात आली. तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी शनिवारी समिती कार्यालयात अधिकृतरित्या घोषणा केली.
खानापूर तालुका म. ए. समितीकडे पाच इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये निरंजन सरदेसाई, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, रुक्माना झुंजवाडकर यांचा समावेश होता. प्रारंभी पाचही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर इच्छुक उमेदवारांना आपसात चर्चा करून एक उमेदवार देण्यासाठी वेळ दिला होता. मात्र त्यांच्यात एकमत न झाल्याने निवड कमिटीने मतदान पद्धतीने उमेदवार निवड करण्याचे ठरविण्यात आले. यानंतर इच्छुक उमेदवारांपैकी विलास बेळगावकर यांनी माघार घेतली. त्यामुळे चार इच्छुकांत मतदान प्रक्रिया राबवण्या आली. यात निवड कमिटीच्या 62 सदस्यांनी मतदान केले. यात सर्वाधिक मते मुरलीधर पाटील यांना मिळाल्याने त्यांची सर्वानुमते अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले.
निवडीनंतर उमेदवार मुरलीधर पाटील, तालुकाध्यक्ष गोपाळ देसाई, सचिव सीताराम बेडरे, खजिनदार संजीव पाटील, सीमासत्याग्रही नारायण लाड, शंकर पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, उपाध्यक्ष कृष्णा कुंभार, प्रकाश चव्हाण, दिपक देसाई, कृष्णा मनोळकर, माती गुरव, अर्जुन देसाई, जयराम देसाई आदिंसह निवड समिती सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी शिवस्मारकातील शिवपुतळ्याला हार घालून घोषणा दिल्या. यावेळी इच्छुक उमेदवार निरंजन सरदेसाई, आबासाहेब दळवी, रुक्माना जुंजवाडकर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यानंतर मुरलीधर पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.









