तालुक्यातून समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा वज्रनिर्धार
खानापूर : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी 9 डिसेंबर रोजी मध्यवर्ती म. ए. समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याला खानापूर तालुक्यातील समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार सोमवारी शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते. सुरुवातीला चिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक करून कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महामेळावा घेण्यात येणार आहे. त्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले की, बेळगावमध्ये ज्यावेळीपासून अधिवेशन घेण्यात येत आहे, तेव्हापासून त्याला विरोध म्हणून समितीचा महामेळावा आयोजित करण्यात येत आहे. मात्र 2022 पासून प्रशासनाकडून आम्हाला जे मागील ते ठिकाण देण्यासाठी अडचण आणून एकप्रकारचा दबाव आणत आहेत. मात्र या दबावाला समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घाबरत नसून येत्या 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्याला ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी अस्मिता दाखवून द्यावी, असे आवाहन केले.
मेळाव्याच्या रितसर परवानगीस नेहमीप्रमाणे चालढकल
अध्यक्षीय भाषणात गोपाळ देसाई म्हणाले की, मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने महामेळावा घेण्यासाठी रीतसर जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. मात्र परवानगी देण्यास नेहमीप्रमाणे चालढकल करण्यात येत आहे. मात्र महामेळावा हा होणारच यात शंका नाही. त्यासाठी मराठी अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी व सीमाप्रश्नाची तळमळ दाखवण्यासाठी खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग दर्शवावा, असे आवाहनही करण्यात आले. या बैठकीला कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, संजीव पाटील, पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, कृष्णा मन्नोळकर, अमृत शेलार, डी. एम. भोसले, राजाराम देसाई, भीमसेन करंबळकर, शंकर गावडा, बळीराम देसाई, जयसिंग पाटील यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









