क्रीडाप्रेमींकडून पाठपुराव्याची गरज : आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सरकारदरबारी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी
खानापूर : खानापूर येथील मलप्रभा क्रीडांगण होऊन दहा वर्षे उलटली. मात्र या क्रीडांगणात खेळाडूंसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. युवा क्रीडा खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोणताच विकास अद्याप झालेला नाही. क्रीडांगणाचा उद्देश पूर्णपणे असफल झाल्याने तालुक्मयातील मैदानी क्रीडापटुंना सरावासाठी क्रीडांगणाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी क्रीडापटूंकडून होत आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून क्रीडांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्यातील क्रीडाप्रेमींतून होत आहे. तत्कालीन आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातून जांबोटी क्रॉस येथील मलप्रभा क्रीडांगणाची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी शासनाकडून जागा मंजूर करून घेऊन जागेचे सपाटीकरण करून एका बाजूला गॅलरी बांधण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त या क्रीडांगणाचा कोणताच विकास झालेला नाही. याकडे आतापर्यंत निवडून आलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तसेच शासनाकडूनच या क्रीडांगणाच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याने क्रीडांगणाची जागाच आकुंचित पावत आहे.
क्रीडांगणाच्या जागेत शाळेची इमारत?
या क्रीडांगणासाठी एकूण साडेचार एकर जागा मंजूर करण्यात आली होती. उर्वरित जागेत मिनी विधानसौधसह इतर शासकीय कामांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्याचे उताऱ्यावर नमूद आहे. मात्र या क्रीडांगणाच्या जागेतच अब्दुल कलाम इंग्रजी माध्यमाच्या शाळेची इमारत उभी करण्यात येत आहे. त्यामुळे मैदानातच अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत ‘तऊण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच क्रीडांगण खात्याच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी या जागेचे पुन्हा सर्वेक्षण केले आहे. प्रत्यक्षात असलेल्या जागेत अब्दुल कलाम शाळेची इमारत असल्याचे स्पष्ट होत आहे. नकाशात फेरफारही झालेला असून सध्या असलेल्या क्रीडांगणाची जागा इतरत्र दाखविली असल्याने सावळागोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत क्रीडाखात्याच्या मंत्र्यांनीच अब्दुल कलाम शाळा इमारतीला अडथळा न आणण्याचे निर्देश क्रीडा खात्याला दिले असल्याचे समजते.
गोकाक क्रीडांगणाच्या धर्तीवर क्रीडांगणाचा विकास होणे गरजेचे
या मैदानाचा विकास गोकाकच्या मैदानाच्या धर्तीवर झाल्यास निश्चितच खानापूर तालुक्मयातील आणि शहरातील क्रीडापटूंसाठी लाभदायक होणार आहे. अलीकडच्या काळात अनेक क्रीडापटू तयार होत आहेत. काही क्रीडापटू राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीयस्तरावर चमकले देखील आहेत. मात्र सरावासाठी मैदान नसल्याने क्रीडापटूंना सराव करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी खानापूर शहरातील मैदानाचा तातडीने विकास होणे आवश्यक आहे. यासाठी या मैदानाचा विकास गोकाकच्या धर्तावर करण्यात यावा, गोकाकच्या मैदानाच्या सभोवताली दुकानगाळे निर्माण करण्यात आले असून या दुकान गाळ्यांच्या भाड्यावरच मैदानाची देखभाल आणि विकास करण्यात येत आहे. याच पद्धतीने खानापूर शहरातील मैदानाचा विकास करण्यात यावा. जांबोटी रस्त्यालगत तसेच मैदानाच्या पूर्व बाजूला दुकानगाळे निर्माण करता येतात. अलीकडेच जांबोटी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली अनेक दुकानदारांचे गाळे काढून त्यांना विस्थापित करण्यात आले आहे. या बेकार झालेल्या व्यावसायिकांना देखील या ठिकाणी व्यवसाय उभारणीस हातभार लावता येणार आहे.
विविध खेळांसाठी ग्राऊंड्स बनवावीत
व्यापार संकुलाच्या मागील बाजूस चेंजिंग ऊम, स्वच्छतागृहे, सामान ठेवण्यासाठी खोल्या तसेच क्रीडा खात्याचे कार्यालय यासह प्रेक्षक गॅलरी निर्माण करता येते. त्याचबरोबर धावपटूंसाठी ट्रॅक, व्हॉलिबॉल, थ्रोबॉल, खो-खो, लांब उडी, उंच उडी, कुस्ती आखाडा यासह इतर मैदानी खेळांसाठी ग्राऊंड निर्माण करावीत. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या पद्धतीचा आराखडा तयार करण्यासाठी क्रीडा खात्याला सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी तालुक्मयातील क्रीडाप्रेमींकडून होत आहे. भविष्यात हे क्रीडांगण तयार झाल्यास तालुक्यातील खेळाडूंना सरावासाठी मैदान उपलब्ध होऊन राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, यात शंका नाही.
क्रीडांगणाचा विकास पूर्णपणे खुंटला
क्रीडांगणाचा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे. हे क्रीडांगण मैदानी खेळासाठी तयार करण्यात आले होते. क्रीडा खात्याच्या निर्देशानुसार या मैदानावर क्रिकेट खेळण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र गेल्या दहा वर्षात या मैदानावर क्रिकेट स्पर्धेशिवाय इतर कोणतेच मैदानी खेळ खेळण्यात येत नाहीत. या ठिकाणी खो-खो, व्हॉलिबॉल, थ्रोबॉल, 100 मीटर, 200 मीटर, पाच हजार मीटर धावण्याचा टॅक तयार करण्यात आलेला नाही. तसेच मैदानावर चेंजिंग ऊम, पिण्याची पाण्याची सोय, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी खोली, फ्लड लाईटची व्यवस्था तसेच अद्ययावत प्रेक्षक गॅलरी, क्रीडांगणाभोवती डेनेज व्यवस्था, मैदानावर पाणी फवारण्यासाठी पाणी व्यवस्था यासह इतर सर्व सुविधांपासून हे मैदान पूर्णपणे वंचित आहे.
क्रीडा खात्यावर दसरा स्पर्धा दुसरीकडे घेण्याची नामुष्की
क्रीडा खात्याचे मलप्रभा क्रीडांगण असूनसुद्धा तालुकास्तरीय दसरा स्पर्धा शांतीनिकेतन शाळेच्या मैदानावर घेण्याची नामुष्की क्रीडा खात्यावर आली आहे. दरवर्षीच्या तालुकास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धा या इतर शाळेच्या मैदानावर भरवण्यात येतात. जर शासनाने या क्रीडांगणाचा विकास केल्यास सर्वच स्पर्धा या ठिकाणी भरविण्यास मदत होणार आहे.









