राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदारांना निवेदन, कामकाजावर बहिष्कार : संबंधित वकिलावर कारवाईची मागणी
खानापूर : देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर माथेफीरू वकील राकेश किशोर तिवारी याने चप्पल फेकण्याचा निंद्य प्रकार केला. त्या घटनेचा खानापूर वकील संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. बुधवार दि. 8 रोजी झालेल्या संघटनेच्या बैठकीत निषेधाचा ठराव संमत करून न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला. तसेच राष्ट्रपतींच्या नावे निषेधाचे निवेदन उपतहसीलदार संगोळी यांना देण्यात आले. वकील संघटनेची बैठक बुधवारी बार असोसिएशनच्या हॉलमध्ये घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बारचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी होते. अॅड. मारुती कदम यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करत घटनेचा निषेध केला. यानंतर अॅड. पी. एन. बाळेकुंद्री यांनी निषेधाचा ठराव मांडला तर अॅड. एच. एन. देसाई यांनी ठरावाला अनुमोदन दिले. देशाचे सरन्यायाधीशच असुरक्षित असतील, तर सर्वसामान्यांची काय गत असेल? याचा विचार करून संबंधीत माथेफिरू वकिलावर कारवाई करण्यात यावी, तसेच न्यायमूर्तीना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना सादर केले.
सदर निवेदन संबंधीत खात्याला पाठवून पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही तहसीलदारांनी दिली. यावेळी अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी म्हणाले, देशाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला ही निंदनीय बाब आहे. एका विचाराने प्रवृत्त असलेल्या माथेफिरू वकिलाच्या अशा कृतीमुळे सबंध वकिलांबाबत चुकीचा संदेश समाजात पसरण्याची शक्यता असल्याने एका विशिष्ठ विचाराने प्रेरीत असलेल्या या विचारधारेवर कारवाई करणे गरजेचे आहे. यावेळी उपाध्यक्ष केशव कळ्ळेकर, सचिव अॅड एम. वाय. कदम, खजिनदार अॅड. जी. जी. पाटील, अॅड. सादिक नंदगडी, अॅड. चेतन मणेरीकर, सिद्धार्थ कपिलेश्वरी आदींसह वकील उपस्थित होते. यानंतर खानापूर वकील संघटनेच्या सदस्यांनी तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निषेध करणारी भाषणे झाली. उपतहसीलदार संगोळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून राष्ट्ऱपतींकडे निवेदन पाठवण्याचे आश्वासन दिले.









