प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तहसीलदार पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त असल्याचे सविस्तर वृत्त तरुण भारतमध्ये शनिवारी प्रसिद्ध झाले होते. याची दखल जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेऊन खानापूर तहसीलदारपदी एम. व्ही. गोठेकर यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. गोठेकर यांनी रविवारी तहसीलदाराचा पदभार स्वीकारला. यावेळी उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार, ग्रेट टू तहसीलदार व्ही. आर. मॅगेरी, व्ही. एस. हिरेमठ, सुनिल देसाईसह इतर कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
खानापूर तहसीलदार पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त असल्याने कार्यालयातील अनागोंदी कारभाराबद्दल तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दखल घेऊन नगरपंचायत विभागातील तहसीलदार एम. व्ही. गोठेकर यांची खानापूरचे प्रभारी तहसीलदार म्हणून नियुक्ती केली आहे.
अनेकजण इच्छुक पण…
खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन यांची बदली झाल्यानंतर तेथे तहसीलदार म्हणून अद्याप कोणाची नियुक्ती नव्हती. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात सावळा गोंधळ निर्माण झाला होता. खानापूर तहसीलदारपदी येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. इच्छुकांनी राजकीय दबाव तंत्र वापरुन वर्णी लावून घेण्याची धडपड सुरू केली आहे.









