तातडीने दुरस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा
खानापूर : खानापूर-हेम्माडगा मार्गावरील शिरोलीजवळ दोन कि. मी. रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अवघ्या दोन कि. मी. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, रस्त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकाना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
खानापूर-हेम्माडगा हा रस्ता सिंधनूर राज्यमार्ग म्हणून ओळखला जातो. हा रस्ता गोव्यासाठी अंत्यत जवळचा रस्ता असल्याने तसेच हेम्माडगा अनमोड परिसरात असलेल्या गावांसाठी हाच मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. नुकतेच या रस्त्याचे नव्याने काम करण्यात आले आहे. मात्र शिरोलीजवळील दोन कि. मी. रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.
त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना धोका पत्करुन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मागणी करुनदेखील दुर्लक्ष केल्याने भीमगड अभयारण्या परिसरातील रहिवाशात संतापाची लाट पसरली आहे. नारायण काटगाळकर यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना नुकतेच निवेदन देवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागणी भीमगड अभयारण्य परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.









