विरोधी पॅनेलमधून एकमेव उमेदवार विजयी : पन्नास वर्षांपासून जुन्या पॅनेलचीच बँकेवर सत्ता कायम
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी करण्यात आली. यात जुन्याच पॅनेलचे वर्चस्व सिद्ध झाले असून विरोधी पॅनेलमधील बाळाराम शेलार हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून जुन्या पॅनेलची सत्ता कायम राहिली आहे.
खानापूर बँकेची अत्यंत चुरशीची निवडणूक 12 जानेवारी रोजी पार पडली होती. दोन्ही बाजूंकडून नव्या मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या नवीन मतदारांना मतदानाचा हक्क दिला होता. मात्र मतमोजणीस स्थगिती दिली होती. गेल्या आठ दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने मतमोजणीस हिरवाकंदील दिला होता. त्यानुसार निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले जिल्हा निबंधक प्रवीण पाटील यांनी खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभागृहात शनिवारी मतमोजणी आयोजित केली होती. त्यानुसार सकाळी 11 नंतर मतपेट्या येथील ट्रेझरी कार्यालयातून आणून मतमोजणीला सुऊवात झाली. प्रथम सामान्य उमेदवारांच्या मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर राखीव उमेदवारांच्या मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. प्रथम बँकेच्या जुन्या मतदारांची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर वाढीव मतदारांच्या मतदानाची मतमोजणी झाली. संपूर्ण मतपत्रिका विभागून मतमोजणी करण्यात आल्याने मतमोजणी दुपारी एक ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती. सहा वाजता जिल्हा निबंधक प्रवीण पाटील यांनी निकाल जाहीर केला.
यामध्ये विद्यमान चेअरमन अमृत शेलार 1094 मते, रामचंद्र गुरव 855, विठ्ठल गुरव 746, मेघशाम घाडी 948, चंद्रकांत पाटील 790, बाळाराम शेलार 802, रमेश नार्वेकर 712 तर महिला उमेदवार अंजली कोडोळी 945 व अंजुबाई गुरव यांना 1021 मते पडली. अ वर्ग विजय गुरव 1051, ब वर्ग माऊती पाटील 985, मागासवर्गीय गटातून मारुती बिलावर 840 आणि परिशिष्ठ जमातीमधून अनिल पाटील 871 अशी विजयी उमेदवारांना मते पडली आहेत. पराभूत उमेदवार परशुराम करंबळकर 370, गोविंद डिगीकर 631, गंगाराम गुरव 697, रविंद्र देसाई 678, राजेंद्र चित्रकार 656, शांताराम निखलकर 484, सीताराम बेडरे 576, संतोष हंजी 644, रंजना पाटील 679, शोभा खानापुरी 613, मारुती खानापुरी 805, राजू पाटील 741, चंद्रकांत देसाई 334, शिवाजी पाटील 743 अशा प्रकारे पराभूत उमेदवारांना मतदान झाले आहे.
निवडणुकीत शिवाजी पाटील आणि रवींद्र देसाई हे दोन संचालक पराभूत झाले आहेत. शिवाजी पाटील यांनी सत्तारूढ पॅनेलमधून बाहेर येऊन विरोधी पॅनेलमधून निवडणूक लढवली होती. तर रवींद्र देसाई हे सत्तारूढ पॅनेलमधून पराभूत झाले. त्यांच्या जागी विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांचे बंधू बलराम शेलार हे निवडून आले आहेत. ही निवडणूक बँकेच्या इतिहासातील अत्यंत चुरशीची बनल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. विरोधी पॅनेलने सत्तारूढ पॅनेलच्या विरोधात प्रचारात आघाडी घेतली होती. नोकरभरतीसह इतर बाबतीत मोठ्या प्रमाणात संचालक मंडळावर आरोप करण्यात आले होते. मात्र सत्तारूढ पॅनेलने सर्व मते खोडून आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित केल्याने बँकेच्या इतिहासात सत्तारूढ पॅनेलने विजयी होण्याची परंपरा कायम राखली आहे. बँकेच्या इतिहासात आजपर्यंत निवडणुकीतून सत्ता परिवर्तन झालेले नाही. पॅनेलला माजी आमदार अरविंद पाटील यांनी उघड पाठिंबा दिल्याने, तसेच दोन भाऊ एकमेकाविरोधात लढत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. बँकेच्या इतिहासात प्रथमच दोन भाऊ संचालक म्हणून निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांचे बंधू बलराम शेलार यांनी विरोधी गटातून निवडणूक लढवली. विरोधी पॅनेलमधून एकमेव उमेदवार निवडून आला आहे.
विजयी पॅनेलच्या समर्थकांनी गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. निवडून आलेल्या संचालक मंडळाने शहरातील देवदेवतांचे दर्शन घेतले.









