2866 पैकी 2131 मतदारांनी बजावला हक्क : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मतमोजणी, दोन्ही बाजूकडून न्यायालयात धाव
खानापूर : येथील खानापूर को-ऑप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि. 12 रोजी समर्थ इंग्रजी शाळेत घेण्यात आली. सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत अतिशय चुरशीने मतदान झाले. दोन्ही बाजूकडील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मतदान केंद्रावर एकच गर्दी केली होती. मतदारांना मतदानाची माहिती देण्यासाठी दोन्ही बाजूकडील समर्थकांची रस्सीखेच सुरू होती. बँकेच्या इतिहासात इतक्या चुरशीची निवडणूक पहिलीच वेळ असल्याची चर्चा व्यक्त होत होती. दोन्ही बाजूंनी उच्च न्यायालयात धाव घेऊन 1 हजार मतदारांना मतदानाचा हक्क मिळवून घेतला होता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरच मतमोजणी होणार असल्याचे जिल्हा निबंधक रविंद्र पाटील यांनी जाहीर केले आहे. खानापूर को-ऑप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी झाली. सकाळी 9 वाजल्यापासून मतदान केंद्रावर सत्तारुढ पॅनेल आणि विरोधी पॅनेल यांच्या उमेदवारांनी आणि समर्थकांनी एकच गर्दी केली होती.
दोन्ही बाजूचे समर्थक मतदारांना वाहनातून आणून चुरशीने मतदान करून घेत होते. बँकेच्या इतिहासात प्रथमच दोन सख्खे भाऊ एकमेकांविरोधात रिंगणात होते. त्यामुळे या निवडणुकीत अतिशय चुरस आणि इर्षा दिसून येत होती. संपूर्ण निवडणुकीच्या कालावधीत दोन्ही गटाकडून आरोप, प्रत्यारोप अगदी शिगेला पोहोचले होते. प्रथम बँकेचे 1921 मतदार होते. विरोधी गटाकडून दीपिका रमेश खानापुरी यांनी तसेच सत्तारुढ गटाकडून नागेंद्र मारुती व्हणमणी यांनी उच्च न्यायालयात वेगवेगळे दावे दाखल करून वाढीव मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी मागणी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने दीपिका खानापुरी यांच्या मागणीनुसार 425 तर नागेंद्र व्हणमणी यांना 520 मतदारांना मतदानाचा हक्क दिला. त्यामुळे 945 मतदार वाढीव झाले. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांची धांदल उडाली होती. नव्या मतदारांच्या न्यायालयाकडून मंजूर झालेल्या मतदार याद्या प्रत्येक बुथला देणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे मतदार याद्यांची प्रत देण्यास बराच विलंब झाला होता. तरीही मतदारांनी चुरशीने मतदानाचा हक्क बजावला.
चोख पोलीस बंदोबस्त
समर्थ इंग्रजी शाळेत मतदानासाठी एकूण दहा बुथ तयार करण्यात आले होते. प्रत्येक बुथवर अडीचशे मतदारांचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्हा निबंधक रविंद्र पाटील यांच्यासह एकूण 60 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तसेच बँकेचे सर्व कर्मचारी मतदानासाठी कार्यरत होते. पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. एकूण 2866 मतदारांपैकी 2131 मतदारांनी हक्क बजावला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मतमोजणी होणार असल्याने मतदान पेट्या येथील ट्रेझरी कार्यालयात लॉकअपमध्ये ठेवण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत दोन्ही गटांना वाट पहावी लागणार आहे.









